‘नक्शा’ कार्यक्रमांतर्गत नगरपालिका हद्दीतील मिळकतीचे नगर भूमापन कामकाजाला सुरुवात

16

बुलढाणा(शासकीय वार्ता)केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्रॅमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘नक्शा’ कार्यक्रमाची प्रायोगिक योजनेची अंमलबजावणी बुलढाणा नगर परिषदेच्या हद्दीत आज बुधवार 30 जुलैपासून सुरु झाली आहे. त्यामुळे बुलढाणा नगर परिषदेच्या हद्दीतील सर्व नागरिकांनी संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन भूमी अभिलेख उप अधीक्षक व्ही. ए.सवडदकर यांनी दिली आहे.

स्थानिक नागरी स्वराज्य संस्था क्षेत्रातील मूळ व विस्तारीत क्षेत्रामधील जमिनींचे भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) आधारित सर्वेक्षण व भूमापन करण्याबाबत नक्शा हा कार्यक्रम केंद्र शासनाकडून एक वर्षाच्या प्रायोगिक तत्त्वावर बुलढाणा येथे पथदर्शी स्वरुपात राबविण्यात येत आहे. याअंतर्गत नगरपालिका हद्दीतील नगर भुमापन करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी 29 जुलै रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. याकामी उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी तसेच प्युरवेज इंफ्रा प्रा.लि. नगरपालिका प्रतिनिधी मिळकतींला प्रत्यक्ष भेट देऊन ग्राऊंड ट्रुथिंग करणार आहे, अशी माहिती सवडदकर यांनी दिली.

  • नक्शा प्रकल्पाचा नागरिकांना होणारा लाभ
    शहरी जमिनीचे ड्रोनच्या साहाय्याने अचूक आणि विस्तृत सर्वेक्षण, आधुनिक जीआयएस प्रणालीवर आधारित डिजीटल मिळकत नकाशांची निर्मिती, नागरिकांना ऑनलाइन डिजीटल मिळकत पत्रिका उपलब्ध होणार, ज्यामुळे मालमत्ता हक्कांचे संरक्षण व आर्थिक व्यवहारात पारदर्शकता निर्माण होईल, शासनाच्या विविध योजनांसाठी विकासोपयोगी जीआयएस नकाशांचा आधार, नागरी हक्कांचे संरक्षण आणि सुविधा योजनांचे अचूक नियोजन करता येईल.