मोताळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाचा हाहाकार;4 मंडळातील हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान !

25

आता, अख्यं आभाळचं फाटलं, ठिगळ कुठं, कुठं लावावं? शेतकऱ्यांची आर्त हाक

मोताळा: अठराविश्व दारीद्रय हे जगाच्या पोशिंद्या शेतकऱ्यांच्या पाचीलाचं पुंजलेलं आहे. कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळ या दृष्टचक्रात शेतकरी मोठ्या प्रमाणात गुरफटला जात आहे. लाखोचे नुकसान होतेयं मदत मात्र हजारोच्या घरात असल्यामुळे शेतकरी मोठा चिंताग्रस्त झाला आहे. रविवार रात्री 2 ते सकाळी 5 वाजेच्या दरम्यान तालुक्यातील चार मंडळात ढगसदृश्य पाऊस झाल्याने हजारो हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, कपाशी, मका व तुरींचे 100 टक्के नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदिल झाला आहे.

मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे, पिंप्री गवळी, पिंपळगाव देवी व शेलापूर या महसूल मंडळात रविवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास अचानक ढगफुटी सदृश्य पावसाने तब्बल 3 तास जोरदार हजेरी लावल्याने सोयाबीन, मका, कपाशीचे 100 टक्के तर तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ढगफुटीमुळे शेतजमिन खरडून गेल्याने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. शेतकऱ्यांनी गंजी मारलेल्या मक्यामध्ये दीड ते फुट पाणी साचले होते. नदी-नाल्यांना पूर आले होते. सिंदखेड गावामध्ये पाणी घुसले होते. शेतीपरिसात सर्वीकडे पिकांचे अतोनात नुकसान व पाणीच पाणी दिसत होते. धा.बढे व लिहा येथील नद्यांना आलेला पूर निसर्गचक्राचे रौद्ररुपाचे दर्शन घडवित होते. लिहा गावातील शेतकऱ्यांचे शेतीपयोगी वाहून गेलेले साहित्य ढगफुटीची साक्ष देत होते. आता शेतकऱ्यांना अपेक्षा आहे शासनाकडून मिळणाऱ्या शासकीय मदतीची.

या पावसामुळे धामणगाव बढे ,रिधोरा खं, वाडी ,सिंदखेड, लपाली, गुगळी, कोल्ही गवळी ,पिंपळगाव देवी ,लिहा, आव्हा, वडगाव, महाळुंगी, काळेगाव, तपोवन, गोतमारा, हणवतखेड, कुऱ्हा, कोऱ्हाळा, खेडी, पान्हेरा, किन्होळा, पोखरी, तपोवन, कालेगाव, सारोळा पीर, सारोळा मारोती, फर्दापूर यासह आदी अनेक गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. लिहा येथील नदीला पूर असल्यामुळे वाहतूक सकाळी जवळपास साडेतीन तास बंद होती. सर्वीकडे ढगफुटीच्या पावसाचे आक्राळ-विक्राळ स्वरुप पहावयास मिळत होते. कृषी विभागाने वर्तविलेल्या प्राथमिक अंदाजानुसार चार महसूल मंडळातील 1000 ते 1100 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. रविवारी सुट्टी असल्यामुळे नुकसानीचा सर्वे सोमवार 3 नोव्हेंबर रोजी नुकसानीचा आकडा समोर येईल.

  • आ.संजुभाऊंची शेतकऱ्यांना 1 लाखाची आर्थिक मदत
    आ.संजय गायकवाड यांनी स्वत: कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना स्वत:जवळील 1 लाखाची आर्थिक मदत दिली. तहसिलदार, कृषी अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी यांची लिहा येथे बैठक घेवून घेवून संपूर्ण सर्व्हे करुन नुकसानीची पाहणी करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी हजर होते.