31 वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी महिला व शेतकरी आक्रमक; प्रश्न मार्गी न लागल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बहिष्कार!

9

बुलढाणा- शेलापूर-भाडगणी रस्त्याचे सन 1994 मध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत खडीकरण करण्यात आले. मात्र, 31 वर्ष उलटून देखील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील मालाची वाहतूक करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. सदर रस्त्याचे डांबरीकरण न केल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शेलापूरातील शेकडो ग्रामस्थ व शेतकरी बांधवांच्यावतीने आज 4 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी, तहसिलदार, मुख्य कार्यकारी अभियंता जि.प.बांधकाम विभाग बुलढाणा यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

१९९४ मध्ये शेलापूर-भाडगणी रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते. डांबरीकरण करण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने वेळोवेळी प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडे मागणी करण्यात आली. मात्र, ग्रामस्थांच्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली. शेलापूर-भाडगणी रस्त्यावरुन शेतमालाची वाहतूक मोठी अडचण होत असून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. सदर रोडच्या डांबरीकरणाचे आदेश तत्काळ देण्यात यावे, अन्यथा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थ तसेच शेतकर्‍यांच्यावतीने जिल्हाप्रशासनास निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदन देतांना रुपाली पाटील, सुनिता आमटे, शैला सुपे, अनुसयाबाई भोपळे, सुरुबाई चिम, सुरेखा नारखेडे, आरती नारखेडे, रेखा पाटील, विजय पाटील, गणेश नरवाडे, श्रीराम नारखेडे, सुनिल नारखेडे, प्रभाकर नारखेडे, डॉ.प्रदीप जैस्वाल, गजानन भोपळे, निलेश नारखेडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

  • शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा संयम सुटला
    31 वर्षापासून रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा संयम सुटला आहे. शेतकऱ्यांना रस्ता देणे हे शासन व प्रशासनाचे आद्यकर्तव्य आहे. मात्र, याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा घेतला आहे. आता जिल्हा प्रशासन तसेच संबंधित विभाग काय तोडगा काढतो? व नागरिकांना कसे शांत करते, हे थोड्या दिवसात समजेलंच!