मोताळा: बोराखेडी पोलिस हद्दीतील नांदुरा तालुक्यातील कंडारी बु.येथील कमळजा नदीच्या पुलाखाली आज 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास नवजात पुरुष जातीचे अर्भक सापडल्याने मोठी खळबळ उडाली. ते अर्भक कोणाचे? ती निर्दयी माता कोण? त्या अर्भकाचा जन्म लपविण्याचा प्रयत्न कोणी केला. याप्रकरणी ‘त्या’ अज्ञाताविरुध्द बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
नांदुरा तालुक्यातील कंडारी बु.येथील कमळजा नदीच्या पुलाखाली आज शुक्रवार 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने नवजात पुरुष जातीच्या अर्भकाचा जन्म लपविण्याचे उद्देशाने व गुप्तपणे त्या अर्भकाची विल्लेवाट लावण्याच्या उद्देशाने कमळजा नदीपात्रात बेवारस फेकून दिलेल्या अर्भकाचे कुत्रे लचके तोडत होते. सदर घटनेची माहिती कंडारी पोलिस पाटील विजयसिंग भगवानसिंग राजपूत यांनी बोराखेडी पोलिसात दिली.
माहिती मिळताच ठाणेदार सिताराम मेहेत्रे तसेच पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत फॉरेन्सीक व्हॅन व पीएचसी टाकरखेडच्या डॉ.सुर्यवंशी मॅडम व कर्मचाऱ्यांनी पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी पोलिस पाटील राजपूत यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी अज्ञाताविरुध्द भारतीय न्याय संहिता 2023 कलम 94 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकाँ.सुपडासिंग चव्हाण हे करीत आहे.


























