बुलढाणा-राज्यामध्ये महिला व तरुण मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठ्या झपाट्याने वाढत आहे. त्याला अमरावती परिक्षेत्र सुध्दा अपवाद नाही. अमरावती परिक्षेत्रात 20 दिवसात 254 महिला व मुली बेपत्ता झाल्याची भयावह आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक मुली 18 ते 22 वर्ष वयोगटातील आहेत. त्याचे दरदिवसाचे प्रमाण 12.7 असे आहे.
सहावर्षापुर्वी अधिवेशनामध्ये बेपत्ता झालेले मुलींचे काय असा प्रश्न सुध्दा उपस्थित करण्यात आला होता. परंतु काळ गेला वेळ गेला आता कोणालाही काहीही घेणेदेणे नाही, अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. राज्यात दररोज शेकडो, हजारो तरुण मुली व महिला बेपत्ता होत आहे. पुढे त्यांचे काय झाले? त्या सध्या कुठे आहेत? त्या सुरक्षित आहे की, त्यांना दलालांनी वेश्या व्यवसायाकडे वळविले काय, याचे खर कारण बाहेर येणे अपेक्षीत आहे. गृहविभागाने बेपत्ता झालेल्या किती मुली व महिलांचा शोध लागला, किती बेपत्ता आहेत. याचा आकडा जाहीर करणे गरजेचे आहे. आकडा जाहीर करण्याबाबत महिला लोकप्रतिनिधींनी सुध्दा हा मुद्दा कधी पटलावर घेतला नाही व राजकीय पक्षाच्या महिला सुध्दा आकडेवारी जाहीर करण्याबाबत कधी सरकारला धारेवर धरल्याचे पहायला मिळाले नाही, हे विशेष!
- जिल्हानिहाय बेपत्ता झालेल्या महिलांची आकडेवारी
अमरावती परिक्षेत्रात 1 ते 20 मार्च दरम्यान 254 महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत.त्याचे प्रमाण पाहीले असता, दर दिवसाला 12.7 मुली बेपत्ता होत आहे. सर्वाधिक 82 मुली यवतमाळ जिल्ह्यातून बेपत्ता झाल्या. त्यापाठोपाठ अमरावती जिल्ह्यात शहरी 28 तर ग्रामीणमधून 39 अशा 67 तर बुलढाणा जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर असून जिल्ह्यात दरदिवसाला 3 मुली अशा 20 दिवसात 62 मुली बेपत्ता झाल्या. अकोला जिल्ह्यात 28 तर वाशिम जिल्ह्यातून 15 मुली बेपत्ता झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.



























