बुलढाणा(शासकीय वार्ता ) आर्थिक वर्ष संपत आले असून, नवीन वर्षाच्या निमित्ताने मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता मार्च महिन्यातील सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही राज्यातील दुय्यम निबंधक आणि सह जिल्हा निबंधक कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मालमत्ता खरेदीदारांनी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दस्त नोंदणी करण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
मार्च महिन्यातील २६, २८, २९ आणि ३१ मार्च २०२६ या चार सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी सर्व दुय्यम निबंधक कार्यालये नियमितपणे सुरू राहतील. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्यांचाही समावेश आहे. ज्या कार्यालयांची साप्ताहिक सुटी शनिवार-रविवार सोडून इतर दिवशी असते, अशा कार्यालयांनी त्यांच्या दोन सुट्यांपैकी एक दिवस कार्यालय सुरू ठेवून कामकाज पूर्ण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने शासकीय महसूल उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तसेच नवीन वर्षानिमित्त अनेक नागरिक नवीन घराची किंवा जमिनीची खरेदी करतात. या काळात दस्तनोंदणीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. मुद्रांक शुल्काची प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी निबंधक कार्यालय सुरू राहील. मुंबई शहर आणि उपनगरासह राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील नोंदणी कार्यालये पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहेत. यामुळे मालमत्ता खरेदीदारांना सुटीच्या दिवशीही आपले दस्त नोंदणीकृत करून घेता येतील.
000


























