प्रश्न बाहेर आले उत्तरे मात्र ठराविकांनाच मिळाले..!!
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (21 FEB.2023) परिक्षा म्हटलं की, वर्षाभरात केलेल्या अभ्यासाचे मुल्यमापन करणारा दिवस म्हणजे बोर्डाची दहावी व बारावीची परिक्षा! आज मंगळवार 21 फेब्रुवारीपासून बारावीच्या परिक्षेला सुरुवात झाली. जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्याचे नियोजन जिल्हाप्रशासनाने केले आहे. त्यासाठी परिक्षाकेंद्रावर मोठा पोलिस बंदोबस्त तसेच भरारी पथक सुध्दा तैनात करण्यात आल्याने विद्यार्थ्यांवर ‘लई स्ट्रीक होतं गड्या परिक्षा केंद्र’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. तर काही विद्यार्थ्यांनी प्रश्न बाहेर आले, उत्तरे मात्र लग्गेबाज विद्यार्थ्यांनाच मिळाल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
जिल्ह्यामध्ये परिक्षा भयमुक्त वातावरणात होण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यासंदर्भात 15 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ.एच.पी.तुम्मोड यांनी बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक सारंग आवाड, निवासी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुंकूंद यांची उपस्थिती होती. कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी भरारी आणि बैठा पथकाची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक तालुक्यासाठी एक व केंद्रासाठी एका भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
- गैरव्यवहार टाळण्यासाठी सर्व परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये परीक्षा कालावधीत परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात संगणक सेंटर, झेरॉक्स सेंटर, मोबाईल सेंटर परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आधीपासून परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे.
प्रश्न बाहेर आले कसे..?
- पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवल्याने बाहेरील माणसांचा परिक्षा केंद्रामध्ये प्रवेश नामुक्कीन, असे असतांना देखील पेपरच्या कॉप्या काही झेरॉक्स केद्रावर उपलब्ध झाल्या असल्याने ते प्रश्न बाहेर कुणी आणले? का आणले? त्यांच्यावर येणाऱ्या काळात कसा बंदोबस्त ठेवल्या जातो, असे अनेक प्रश्न हुशार व सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या पालकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.