आंदोलनाला आज एकवर्ष पूर्ण झाले; हाती काय पडले?

470

धनगर समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी; सोनाजी रसाळ चढला होता बुलडाणा येथील बीएसएनएलच्या टॉवरवर !

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (21 FEB.2023) आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. परंतु आंदोलन करतांना आपला जीव जावू नये, याची काळजी घेणेही गरजेचे आहे. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, मेंढपाळांना वनविभागाच्या जमिनीमध्ये चराई पास देवून अडवणूक होवू नये, यासह आदी मागण्यांसाठी मोताळा तालुक्यातील वारुळी येथील सोनाजी शांताराम पिसाळ हा युवक 21 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 6 वाजेच्या बुलढाणा शहरातील बीएसएनएलच्या टॉवरवर चढला त्या युवकाला खाली उतरवितांना महसूल व पोलिस प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती. आज 21 फेब्रुवारी 2023 रोजी त्या घटनेला एकवर्ष पुर्ण झाले, परंतु धनगर समाजाचा एसटी.प्रवर्गात समावेश झालेला नाही, ही एक शोकांतीका म्हणाली लागेल!

बुलडाणा शहरात बीएसएनएलच्या टॉवरवर 21 फेब्रुवारी 2022 रोजी चित्रपटामध्ये शोभेल अशीच परत एक घटना शहरात परत घडली होती. मोताळा तालुक्यातील वारुळी येथील तरुण सोनाजी शांताराम पिसाळ हा युवक धनगर समाजाला आरक्षणासह मेंढपाळांना चराई क्षेत्र आरक्षीत करण्यात यावे, मेंढपाळांविरुद्ध वनविभागाने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासह आदी मागण्यांसाठी तो टॉवरवर चढला होता. त्याची माहिती त्याने व्हीडीओ कॉल करुन गावातील मित्रमंडळींना माहिती दिली. सोनाजीला खाली उतरविण्यासाठी महसूल व पोलिसांची मोठी कसरत करावी लागली. अखेर महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन व आ.संजय गायकवाड, आ.गोपीचंद पडवळकर यांनी फोन करुन खाली उतरविण्याची विनंती केली. तसेच बुलडाणा तहसिलदार रुपेश खंडारे यांनी फोन करुन सदर मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावू, असे आश्वासन दिल्याने सोनाजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास खाली उतरविण्यात यश आले होते. या घटनेला एकावर्षाचा कालावधी उलटला आहे, परंतु या एका वर्षाच्या काळात हाती काय पडले? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.

मराठ्यांचे आंदोलनही बेदखल..

मराठ्यांनी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभर शांतता मार्गाने मोठे मूक मोर्चे काढले. आरक्षणासाठी अनेक तरुण शहीद झाले. लाखो-करोडो महिला व पुरुष समाजबांधव रोडवर उतरुन शांततामय मूक आंदोलने केली. मराठ्यांच्या त्या आंदोलनाची संपूर्ण जगाने दखल घेतली, आंदोलनाला नुकतीच 7 वर्ष पुर्ण झाली परंतु मराठ्यांच्या पदरात काय पडले? भविष्यात काय पडेल , कुणालाच माहिती नाही, एवढे मात्र निश्चीत !