मोताळा तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीचे तांडव !

1886

-टाकळी येथे टिनपत्रे उडाल्याने 75 वर्षीय महिलेच्या पायाचे तुकडे पडले
-मुर्तीतील 25 घरावरील टिनपत्रे उडाली
-रोहिणखेड येथे झाड पडून एक बैल ठार
-झाडे रोडवर पडल्याने वाहतुकीचा झाला होता खोळंबा
-टाकळी, वाघजाळ, राजूर येथील विद्युत पुरवठा खंडीत

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (26.Apr.2023) तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मुर्ती, टाकळी, वाघजाळ, रोहिणखेड, अंत्री, परडा , शिरवा , कोथळी, काबरखेड, वडगावसह परिसरातील अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. वाघजाळ फाट्यावरील 2 पानटपऱ्या अक्षरश: उडून रोडवर पडल्या. रोहिणखेड येथे 1 बैल झाडाखाली दबून ठार झाला. टाकळी येथील पोलिस पाटील सुरेद्र शिराळ यांच्या आई अंजनाबाई शिराळ यांच्या पायावर दगड पडल्याने त्यांच्या पायाचे तुकडे पडल्याने त्यांना बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मका, पपई, आंबे , वांगे, कांदा, केळी व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.

मोताळा तालुक्यात आज बुधवार 26 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सुसाट्याच्या वाऱ्यामुळे मुर्ती ते वाघजाळ फाट्या दरम्यान जवळपास 15 ते 20 झाडे रोडवर कोलमडून पडली होती. वाघजाळ येथे करण राजपूत यांची पान टपरी उडून त्यांच्या टपरीतील मालाचे मोठे नुकसान झाले. रमेश शिवणेकर यांचे टिनपत्रे उडाली. परडा येथे सुध्दा विद्युत खांब कोसळले. टाकळी येथील पोलिस पाटील सुरेंद्र शिराळ यांच्या घरावरील टिनपत्रे उडाली, यावेळी भला मोठा दगड 75 वर्षीय अंजनाबाई शालीग्राम शिराळ यांच्या पायावर पडल्याने त्यांच्या पायाचे टुकडे पडल्याने त्यांना बुलढाणा येथील एका हॉस्पीटल उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मुर्ती येथे 20 ते 25 नागरिकांच्या घरावरील टिनपत्रे उडून त्यांच्या घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचा मका कोलमडून पडला आहे. तसेच कांदा, पपई, आंबे, लिंबु, वांगे यासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रोहिणखेड येथे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून साहित्याची मोठी नासाडी झाली. संजय पाखरे यांनी निंबाच्या झाडाला बांधून ठेवलेला एक बैल झाड कोसळल्याने झाडाखाली दबून ठार झाल्याने त्यांचे जवळपास 50 हजाराचे नुकसान झाला आहे. तसेच अनेकांच्या गोठ्यावरील व घरावरील टिनपत्रे उडाली.

वाघजाळ फाटा ते रोहिणखेड दरम्यान अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर कोलमडून पडल्यामुळे काहीवेळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. परंतु रस्त्याने येणारे जेसीबीने झाडे बाजूला करत वाट मोकळी करून दिली . धा. बढे बस स्थानक परिसरातील काही दुकानांमध्ये पाणी शिरले होते. धा. येथे आठवडी बाजार असल्यामुळे दुपारी झालेल्या पावसामुळे व्यापारी भाजीपाला विक्रेते तसेच ग्राहकांची धांदल उडाली होती. महसूल विभागाने तातडीने नुकसानीचा सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी काँग्रेसचे नेते Adv.गणेशसिंग राजपूत यांनी मोताळा तहसिलदारांकडे केली आहे.