BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (9.May.2023) आजरोजी जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यागावासह शहरी भागात ‘आर्थिक’ देवाण घेवाणीमुळे राजरोसपणे अवैध दारुची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. प्रत्येकजण अवैध दारु विक्रीमुळे होणारा त्रास निमुटपणे सहन करीत आहे. परंतु जयपूर येथील सामाजिक कार्यकर्ते सारंगधर सातव हे मैदानात उतरले असून त्यांनी व महिलांनी जयपूर येथील दारु विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी मोताळा तहसिल कार्यालयासमोर आज 9 मे पासून आमरण उपोषण सुरु केले आहे.
बोराखेडी पोस्टे.अंतर्गत असलेल्या जयपूर येथे राजरोसपणे सर्रास अवैध दारु विकी सुरु आहे. बोराखेडी पोस्टे.ला वारंवार तक्रारी करुन सुध्दा कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. दारु विक्रीमुळे गावातील तरुण युवक हे व्यसनाधीन होत असून यामुळे भांडणाचे प्रमाण सुध्दा वाढले आहे. त्यामुळे गावात अशांतता वाढलेली असून महिला व नागरिकांमध्ये मोठा रोष वाढला आहे. नागरिकांचा पोलिस यंत्रणेवरचाच विश्वास उडत चालला आहे. सदर अवैध दारु विक्री बंद करण्यासाठी आज मंगळवार 9 मे पासून सामाजिक कार्यकर्ते सारंगधर सातव व महिलांनी मोताळा तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. निवेदनावर शेकडो महिला व पुरुषांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मोताळा तहसिलदार सुध्दा एक महिला असल्याने या उपोषणाची केंव्हा दखल घेतली जाईल, हे येणाऱ्या दिवसात समजेल?
जीव गेला तरी चालेल-उपोषणकर्ते
सध्या मोताळ्यात कमालीचे उन आहे. या कडक उन्हात सुध्दा उपोषण कर्त्यांचे उपोषण सुरु असून जीव गेला तरी चालेल, पण जयपूर गावातील अवैध दारु विक्री बंद झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा उपोषण कर्ते सारंगधर सातव व महिलांनी घेतला आहे.
‘काय’द्या घ्या मुळे ‘जीओ ओर जीने दो’!
भारतात लोकशाही आहे, ही लोकशाही वांझोटी झाली की काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असून या कायद्याच्या राज्यात ‘काय’द्या ‘घ्या’ यामुळे ‘कायद्या’चे लख्तरे वेशीवर टांगल्या जात असून गावातील अवैध दारु विक्री बंद करण्यासाठी महिला व पुरुषांना उपोषण करावे लागते, यापेक्षा दुसरी शरमेची दुसरी गोष्ट काय असेल, या ‘काय’द्या च्या राज्यात? असा प्रश्न सुज्ज्ञ नागरिकांना पडला आहे.