स्वयंपाक करीत असतांना विद्युत पोल कोसळला; महिला थोडक्यात बचावली !!
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (24.May.2023) आज मानवाने मंगळापर्यंत मजल मारली आहे. फोरजीच्या युगात तो क्षणार्धात देश-विदेशामध्ये संवाद साधू शकतो, परंतु निसर्गाच्या पुढे कोणीच जावू शकत नाही, याचा ज्वलंत थरारक मंगळवार 23 मे रोजी मोताळा तालुक्यातील घुस्सर येथे सायंकाळी 5.15 ते 5.45 वाजेच्या दरम्यान पहायला मिळाला. पंधरा ते वीस मिनीटात सर्व गावातील चित्रच बदलले. झाडे घरावर कोसळली, ठिकठिकाणी इलेक्ट्रीकल विद्युत खांब कोसळले, एक महिला स्वयंपाक करीत असतांना विद्युत पोल कोसळल्याने महिला थोडक्यात बचावली आहे.
उन्हाळाचा दिवस असल्याने साधारण सायंकाळी 5 ते 6 हा वेळ ग्रामीण भागातील महिलांचा स्वयंपाक करण्याचा वेळ असतो. याच दरम्यान आज मंगळवार 23 मे रोजी अचानक वातावरणामध्ये बदल होवून निसर्गाने आपले रौद्ररुप दाखविले. केवळ 30 मिनिटात म्हणजे सायंकाळी 5.15 ते 5.45 दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यावेळी सोसाट्याने वाऱ्याने अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. गावात जागोजागी इलेक्ट्रीकल पोल व झाडे पडली. अनेकांच्या गुरांचे गोठ्यावरील टिनपत्रे उडाली, घरावर इलेक्ट्रीकल पोल पडले परंतु सुदैवाने जिवीतहानी टळली. शेलापूर ते घुस्सर रस्त्यावर जवळपास 20 ते 22 झाडे पडल्याने मलकापूर-बुलढाणा रोडवरील वाहतूकीचा खोळंबा झाला होता.
महिला थोडक्यात बचावली
नारायण हरीचंद्र जाधव यांच्या घरावरील टिनपत्रे उडाली व त्यांच्या घरावर इलेक्ट्रीकल खांब कोसळला, रमेश भगवान जाधव यांची पत्नी स्वयंपाक करत असतांना अचानक झाड कोसळल्याने त्या थोडक्यात बचावल्या. त्यांच्या घरातील कापूस, गहू पावसाने ओले झाले. शिवाजी सखाराम जाधव यांच्या घरावरील टिनपत्रे, भिमराव इंगळे यांच्या गुरांच्या गोठ्यातील टिनपत्रे उडून ढोरांच्या अंगावर पडली. संपूर्ण गावात इलेक्ट्रीकल पोल पडल्याने गावातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. सुदैवाने जिवीतहानी टळली. नुकसानीचा सर्व्हे करुन मदत देण्याची मागणी घुस्सर येथील ग्रामस्थांकडून होत आहे.