रोहिणखेड येथील शेतकरीपुत्राची मुर्ती शिवारात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या!

702

मोताळा(BNU न्यूज)- मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील एका ३२ वर्षीय शेतकरी पुत्राने मुर्ती शिवारात असलेल्या शेतात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना १० सप्टेंबरच्या रात्री ८ वाजेच्या उघडकीस आली. मृतकाचे नाव नरसिंग भावसिंग मगरे असे आहे.
रोहिणखेड येथील शेतकरी भावसिंग मगरे यांचा मुलगा नरसिंग मगरे (वय ३२) हा १० सप्टेंबर रोजी दुपारच्या दरम्यान मुर्ती शिवारात असलेल्या शेतात गेला होता. तो बराच वेळ होवून देखील परत आला नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी गावात व इतरत्र त्याचा शोध घेतला. परंतु तो आढळून न आल्याने त्याचा मुर्ती शिवारात असलेल्या शेतात शोध घेतला असता तो रात्री ८ वाजेच्या दरम्यान मुर्ती येथील शेतात मृत अवस्थेत आढळून आला. त्याने विषारी औषध घेतल्याचे बोलले जाते. तो घरातील कमविता कर्ता पुरुष होता. मृतकाच्या वडिलांचे नावे मुर्ती शिवारात ३ एकर शेती असून त्यावर बँक ऑफ महाराष्ट्र रोहिणखेड शाखेचे ८० हजार रुपयांचे कर्ज होते. घरातील कर्ता पुरुष असल्याने कर्ज कसे फेडाव, घर कसे चालवावे या विवंचनेत नरसिंग मगरे या युवा शेतक-याने आत्महत्या केल्याचे मृतकाचे चुलत बंधू अविनाश मगरे यांनी सांगितले. मृतकाच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, २ भाऊ असा आप्त परिवार आहे. मृतकावर आज रविवार ११ सप्टेंबर दुपारी १२ वाजेच्या सुमारास रोहिणखेड येथे शोकाकूल वातावरणा अंत्यसंस्कार करण्यात आले.