बुलढाणा: बुलढाणा-चिखली मुख्य रहदारीच्या रोडवर असलेल्या केळवद गावाच्या चौफुलीवर तीन फुट पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारक, शाळकरी मुले व नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या आठ दिवसात देवून पाण्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास अधिकाऱ्यांना डाबकात बसविण्याचा इशारा, युवक काँग्रेसचे पदाधिकारी सनी पांढरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
चिखली तालुक्यातील केळवद गावावरुन शिरपूर , किन्होळा, वाडी, ब्रम्हपुरी, केळवद ग्रामस्थांसह चिखली- बुलढाणा येथे दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचून रस्त्याला ओढ्यांचे स्वरुप आल्याने नर्सरी ते पदवीचे शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुले-मुली, ज्येष्ठ नागरीक, शेतकरी यांच्यासह प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर मृतकावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थांना रस्त्यावरील वाहत्या पाण्यात जावून तारेवरची कसरत करावी लागते.
जयश्रीताई शेळकेंचे निवेदनाला केराची टोपली
या समस्येवर आधी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव ADV.जयश्रीताई शेळके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांना निवेदन देवून रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे. आता पुन्हा युवक काँग्रेसच्यावतीने कार्यकारी अभियंत्यांना आठ दिवसाचा अल्टीमेटम दिला असून रस्त्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास संबधित अधिकाऱ्यांना डाबकात बसविण्याचा आक्रमक पवित्रा युवक काँग्रेसचे सनी पांढरे यांनी घेतला आहे.