शासन हमीवर जिल्हा केंद्रीय बँकेस 300 कोटींचे ‘सॉफ्ट लोन’ मंजूर ! बँकेकडून सुरक्षीत कर्ज वाटपास सुरुवात !!

44

बुलढाणा: बुलडाणा जिल्हा केंद्रीय बँकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता माजी मंत्री आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी वेळोवेळी 300 कोटींचे सॉफ्ट लोन मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शासनाने हमी घेतल्याने जिल्हा केंद्रीय बँकेस 300 कोटींचे सॉफ्ट लोन 29 जून रोजी मंजूर करण्यात आले असून बँकेकडून सुरक्षीत कर्ज वाटपास सुरुवात केल्याची माहिती जिल्हा केंद्रीय बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अ.वा.खरात यांनी दिली आहे.

शासन हमीवर जिल्हा केंद्रीय बँकेस राज्य सहकारी बँकेच्या 29 जूनच्या पत्रानुसार 300 कोटींचे सॉफ्ट लोन मंजूर केले आहे.. मंजूर कर्जापैकी बँकेने सुरुवातीला 5 कोटी उचल केला असून या रकमेचे योग्यप्रकारे नियोजन करुन बँकेने कर्जवाटपाचे धोरण सुरु केले आहे. कर्जवाटपामुळे बँकेस उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होणार असून बँकेच्या उत्पन्नात वाढ होवून बँकेचा संचित तोटा कमी होण्यास मदत होवून बँक पुर्वपदावर येणार आहे. शासन हमीवर लोन मिळणारी बुलडाणा जिल्हा ही राज्यातील पहिली बँक आहे.

असे आहे कर्जवाटपाचे धोरण

पगारदार नोकरदारांसाठी एसटी/एमटी/ओडी, सोनेतारण कर्ज, पगारदार नोकरदारांच्या पतसंस्थांना कर्ज, वाहन कर्ज, गृहकर्ज, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ/एम.एस.आर.एल.एम./एन.एल.एम कर्ज, बचत गट, सूक्ष्म कर्ज पुरवठा, इतर शासकीय योजनेतंर्गत कर्ज पुरवठा, कॅश क्रेडीट कर्ज, शेती व बिगर मध्यम मुदत कर्ज, गोडावून, वैयक्तीक कर्ज वाटप सुरु करण्यात आले आहे.