बुलढाणा-आंबेडकरी चळवळीत साहित्य सांस्कृतिक सिंचनाची मशागत करतांना पन्नास वर्षे १९६७ ते डिस२०१७ या कालावधीत सतत कार्यरत राहून अनेक लिहित्या आणि बोलक्या मनांना अस्मितादर्शच्या माध्यमातून लिहिणे आणि बोलण्यासाठी संधी देत डॉ. गंगाधर पानतावणे सरांनी साहित्यिकांच्या पाच पिढ्या घडवल्या असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक सुरेश साबळे यांनी केले.
राजे छत्रपती कला महाविद्यालय धामणगाव बढे येथे डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त चर्चासत्राच्या आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून बालसाहित्यिक सुभाष किन्होळकर, डॉ.अक्षय घोरपडे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश मेश्राम होते. याप्रसंगी डॉ. घोरपडे म्हणाले डॉ. गंगाधर पानतावणे यांनी अनेक साहित्यिकांना लिहिते बोलते करण्याचे काम केले तसेच अनेक साहित्यिकाच्या साहित्याचे पुनर्लेखन करून त्यांची ग्रंथ संपदा वाढविली तर बाल साहित्यिक सुभाष किन्होळकर यांनी डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या साहित्याचे गौरवपूर्ण विवेचन केले. तर चर्चा सत्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश मेश्राम यांनी बोलताना डॉ. पानतावणे यांची समाजप्रबोधनाची प्रयोगशाळा म्हणून ओळख निर्माण करुन दिली. अशा डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या स्मृतिदिनी चर्चासत्राचे आयोजन म्हणजे त्यांचे साहित्यिक कार्य पुढे चालविणे असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्वप्नील दांदडे,सुत्रसंचालन प्रा. डॉ. सुनील पवार तर आभार प्रदर्शन प्रा. महेश नागरे यांनी केले.



























