वारकरी धर्म परिषदेची विदर्भातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
बुलढाणा : वारकरी संप्रदायातील कालनेमींना ओळखने वारकऱ्यांच्या सात्विकतेसाठी काळाची गरज आहे. पंढरीश पांडुरंगाचा वारकरी, ज्ञानोबा तुकोबांचा वारकरी हा कधीच विवादात पडत नाही..भगवंता शिवाय कुणाचीही गुलामी लाचारी पत्करत नाही…कोणताही देखावा बागुलबुवा करत नाही… परंतु सद्यस्थितीत महाराष्ट्रात राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या कालनेमी संत महात्म्यांनी संप्रदायिक परंपरा मोडीत काढण्याचा प्रयास सुरू केला आहे, असे मत वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वारकरी धर्मभूषण हभप. वासुदेव महाराज शास्त्री यांनी केले.
बुलढाणा येथील महात्मा फुले सभागृह येथे 14 एप्रिल रोजी वारकरी धर्म परिषदेची विदर्भातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यावेळी शास्त्री महाराज बोलत होते. वारकरी धर्म परिषदेचे आयोजन विदर्भ विभागीय अध्यक्ष कथाकार हभप. विलास महाराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेत तर राष्ट्रीय महासचिव हभप. अँड.सतीशचंद्र रोठे पाटील, विदर्भ प्रदेश युवक अध्यक्ष युवाचार्य राहुल वाकेकर, हभप.अविनाश महाराज पाटील, हभप. गजानन महाराज, सुशांत पाटील, राम व्यवहारे, विजय साबळे पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मालार्पण करीत अभिवादन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली. संचलन कमलाकर व्यवहारे यांनी तर आभार प्रदर्शन संजय ऐंडोले यांनी केले.
सदर बैठकीमध्ये संघटन बांधणीच्या अनुषंगाने जळगाव खान्देश आणि बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरील भाग एक चे जिल्हाध्यक्ष पदाचे महत्त्वपूर्ण बदल सर्वांनूमते करण्यात आले. भूतपूर्व जिल्हाध्यक्ष यांना पदमुक्त करण्यात आले. त्याऐवजी जळगाव खान्देश चे जिल्हाध्यक्ष म्हणून कथाकार हभप अविनाश महाराज पाटील यांची तर बुलढाणा घाटावरील भाग एकचे जिल्हाध्यक्ष म्हणून हभप गजानन महाराज ठेंग, घाटाखालील युवती जिल्हाध्यक्ष हभप. आरतीताई आढाव यांची सर्वानुमते निवड करीत नियुक्तीपत्र देण्यात आले.
वारकरी धर्मभूषण पुरस्काराने शैलेश वारे सन्मानीत
महाराष्ट्रातील नवरत्नांना दिला जाणारा वारकरी धर्म परिषदेचा सर्वोच्च वारकरी धर्मभूषण पुरस्कार यावर्षी शैक्षणिक क्षेत्रातील अद्वितीय उत्कृष्ट कार्याबद्दल राजीव गांधी मिलिटरी स्कूलचे उपप्राचार्य शैलेश प्रल्हाद वारे यांना प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सर्वांगीण विकासाबरोबर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रसेवेचे, सैनिकी भरतीची उत्कट गुण पेरण्याचे काम केले. आदी महत्वपूर्ण कार्यासाठी सदर बैठकीत सर्वांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.


























