729 गावे टंचाईग्रस्त घोषित;18 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, तर 59 गावांमध्ये विहिरी अधिग्रहित
बुलढाणा : ‘अल नीनो’च्या प्रभावामुळे यंदाच्या मान्सूनबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. जलस्रोतांचे संवर्धन आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिले.
नियोजन भवन येथे पाणी टंचाईचा आढावा बैठकीत पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभा आमदार संजय गायकवाड, श्वेता महाले, मनोज कायंदे, सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे, विभागीय वन अधिकारी जमीर शेख, यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री ना. पाटील यांनी पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये नागरिकांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे, त्या गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेंतर्गत कामे तातडीने पूर्ण करावीत. निधीअभावी प्रलंबित असलेली जलसंधारणाची कामे प्राधान्याने मार्गी लावावीत. आवश्यक अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावेत. प्रस्तावित तांत्रिक कामांना त्वरित मंजुरी देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कार्य करावे. कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले. पुढे ते म्हणाले की, संभाव्य कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेततळे, नाला बांध दुरुस्ती, खोलीकरण, तलावातील गाळ काढणे तसेच जलस्रोत पुनर्भरणाची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. ग्रामीण भागात पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मोठ्या प्रकल्पांमध्ये 27.39 टक्के पाणीसाठा
जिल्ह्यात नळगंगा, खडकपूर्णा व पेनटाकळी हे तीन मोठे प्रकल्प असून 7 मध्यम व 41 लघु प्रकल्प असे एकूण 51 प्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पांमध्ये 27.39 टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये 38.24 टक्के तर लघु प्रकल्पांमध्ये 27.24 टक्के असा सरासरी 30.64 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्याचा जून 2026 पर्यंतचा पिण्याच्या पाण्याचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून 729 गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. त्यापैकी सध्या 18 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर 59 गावांमध्ये विहिरी अधिग्रहित करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


























