निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं! शिवसेना नाव वापरण्यावरही बंदी;उध्दव ठाकरेंना धक्का!!

370

नवी दिल्ली(BNUन्यूज) शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का बसला असून शिवसेनेचे धनुष्यबाण हे अधिकृत निवडणूक चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात गोठवलं असून शिवसेना हे नावही उध्दव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना वापरण्यास तुर्तास मनाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाला खरी शिवसेना कुणाची याचा निर्णय न घेता आल्याने हा अंतरीम निर्णय घेण्यात आला आहे.

शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करुन महाराष्ट्रात सरकार स्थापन केले होते. सदर युती तोडून सरकारमधून बाहेर पडण्यासाठी शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी करीत भाजपासोबत युतीचे सरकार स्थापन केले. हे राजकीय युध्द एवढ्यावर न थांबता शिवसेना कुणाची यासाठी सदर प्रकरण न्यायालयात गेले होते. परंतु न्यायालयाने हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिल्याने आज हा निर्णय घेण्यात आला आहे. अधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही. हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा असून केवळ आगामी निवडणुकापुरता मर्यादित आहे. तो निर्णय भविष्यातील निवडणुकांच्या वेळी बदललाही जाऊ शकतो. मात्र तूर्तास अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाल्याने या निवडणुकीत ठाकरे गट कोणतं चिन्हं निवडणार याची उत्सुकता आहे. तीन नोव्हेंबर रोजी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी १४ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. उद्धव ठाकरे यांनी येथील दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी असून त्यांच्यासाठी डोअर टू डोअर प्रचाराचं तंत्र उद्धव ठाकरेंनी अवलंबलं आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून ऋतुजा लटके यांचं नाव देण्यात आलं आहे. परंतु निवडणूक चिन्हाच्या अभावी भाजपला थेट फायदा होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तूळात सुरु आहे.