सैनिक रवींद्र राखोंडे यांचेवर शासकीय इतमामात सोनेवाडी येथे अंत्यसंस्कार !

543

दीड वर्षाच्या रुद्राक्षच्या हस्ते देण्यात आली चिताग्नी..!

संजय निकाळजे..
BNU न्यूज नेटवर्क..
चिखली (Date.25 Jan.2023) सात वर्षापासून देश सेवा करत असलेले व सध्या पंजाबमध्ये सैन्यदलात कार्यरत असलेले सैनिक रवींद्र राखोंडे गावी सुट्टीवर आल्यावर त्यांच्या मोटर सायकलचा अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्रथम बुलढाणा व त्यानंतर पुणे येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते, मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मंगळवार २४ जानेवारी रोजी सकाळी मृत्यू झाला. त्याचे पार्थिव आज बुधवार २५ जानेवारी रोजी त्याच्या मुळगावी सोनेवाडी ता.चिखली येथे आणून तेथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

चिखली तालुक्यातील सोनेवाडी येथील सैनिक रवींद्र पांडुरंग राखोंडे (वय २६ ) हे नांदेड येथे सन २०१६ मध्ये भरती झाले होते. सध्या ते पंजाब येथे आपले कर्तव्य बजावत होते. १ जानेवारी रोजी ते सोनेवाडी येथे सुट्टीवर आले होते. ते १३ जानेवारी रोजी ते रुईखेड मायंबा येथे बहिणीकडे जात असताना त्यांचा पळसखेड भट- पिंपळगाव सराईजवळ मोटर सायकलचा अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्रथम बुलढाणा येथे उपचारासाठी नेण्यात आले. व त्यानंतर १५ जानेवारी रोजी कमांड हॉस्पिटल पुणे येथे उपचारासाठी दाखल केले. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र २४ जानेवारी रोजी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचे पार्थिव बुधवार २५ जानेवारी रोजी सकाळी त्याच्या गावी सोनेवाडी येथे आणल्यानंतर त्यांच्या पार्थिवाची गावातून मिरवणूक काढण्यात येवून गावाशेजारी असलेल्या स्मशानभूमी परिसरात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

याप्रसंगी त्यांचे पार्थिवावर मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी शासनाचे अधिकारी म्हणून तहसीलदार अजितकुमार येळे, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, गटविकास अधिकारी भारसाखळे, रायपूर ठाणेदार राजवंत आठवले, मंडळ अधिकारी किशोर पाटील, ग्रामसेवक खेडेकर, मु.अ.विकास बाहेकर, तलाठी अजित पवार यांचेसह आमदार प्रतिनिधी म्हणून अंकुशराव पडघान, शिवसेनेचे कपिल खेडेकर, दत्ता खरात, नंदू कराडे, ज्योतीताई खेडेकर ,राजपूत तसेच मा सैनिक अधिकारी भास्कर पडघान, सैनिक कल्याण कार्यालय अधिक्षक संजय गायकवाड, माजी सैनिक संघटनेचे मेजर अशोक शेळके, त्रंबक नेमाने, माजी सैनिक गंगाराम चिंचोले, विश्वनाथ पवार, रामेश्वर सोळंकी सुभेदार एस आर मुलावी, नायक जगताप आदींचा सहभाग होता.

यावेळी सैनिक रवींद्र राखोंडे यांचा अठरा महिन्याचा मुलगा रुद्राक्ष याच्या हस्ते चिताग्नी देण्यात आला. यावेळी सरपंच ज्ञानेश्वर गोफणे, पोपा. शिवचरण पवार, उपसरपंच बाळासाहेब पवार, तंटामुक्ती अध्यक्ष विलासराव तायडे, सुरेश जाधव, प्रभाकर तायडे, शंकरराव तायडे, रमेश शिरसाठ, शिवाजी तायडे, अंकुश पवार, ज्ञानेश्वर जंजाळ, अरुण पंडित, प्रदीप वाकोडे, सुभाष शिरसाठ आदींची उपस्थिती होती. यावेळी युवा वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले. अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमासाठी सामाजिक, राजकीय, पत्रकारितासह इतर क्षेत्रातील व नागरिक, महिला, युवा वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थित होती. शेवटी सर्वांच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

27 जानेवारीला सावडण्याचा कार्यक्रम..
सैनिक रवींद्र राखोडे यांच्या पश्चात वडील, ४ बहिणी, पत्नी किरण व १ वर्षाचा मुलगा रुद्राक्ष असा आप्त परिवार आहे. ते आई-वडिलास एकुलते एक चिरंजीव होते. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा सवडण्याचा कार्यक्रम शुक्रवार २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ठेवण्यात आला आहे.