मोताळा तालुका काँग्रेसच्या आंदोलनाचा सा.बां.विभागाने घेतला धसका ! दोन तासात रोडवर मुरुम टाकला ; पण मोजक्याच ठिकाणी ?

388

मोताळा(BNUन्यूज)कित्येक वर्षानंतर नांदूरा ते मोताळा रोडचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले. आता प्रश्न उरला तो कृषी उत्पन्न बाजार समिती ते मोताळा फाटा या रोडचा, या रोडच्या दुरुस्तीबाबत कित्येकवेळा काँग्रेसने निवेदनाद्वारे पाठपुरावा करुन देखील ढेपाळलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्याने आज 4 नोव्हेंबर रोजी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन मामलकर यांच्या नेतृत्वात नांदूरा रोडवरील डॉ.फेंगडे यांच्या घरासमोरील खड्डयामध्ये बेशरमचे झाडे लावून प्रचंड घोषणाबाजी करुन आंदोलन करण्यात आले. सकाळी 11 वाजता सुरु झालेल्या आंदोलनाची सा.बां.विभागाचे अधिकारी काळवाघे यांनी दुपारी 1 वाजता लेखी आश्वासन देवून 2 वाजेपर्यंत मुरुम टाकण्याचे आश्वासन देवून मुरुम सुध्दा टाकला परंतु मोजक्याच ठिकाणी, यामुळे उर्वरीत खड्डयासाठी इतर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनासाठी सज्ज रहावे का? असा इशाराच जणू काही सा.बां.विभागाने दिला तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आठवडी बाजार ते मोताळा फाटा या 1 कि.मी.मुख्य रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. रोडला जवळपास 1 ते दिड फुटाचे खड्डे पडलेले आहेत. या रोडने वाहन चालकांना जीव मुठीत धरुन खड्डयात रस्ते की रस्त्यात खड्डे पाहून वाहन चालवावे लागते. पावसाळ्यामध्ये या खड्डयामध्ये पाणी साचल्याने अनेकवेळा दुचाकी स्लीप होवून अपघात सुध्दा घडलेले आहेत. काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष गजानन मामलकर यांच्या नेतृत्वात सकाळी 11 वाजता नांदूरा रोडवरील डॉ.सुभाष फेंगडे यांच्या हॉस्पीटल समोरील रोडवर बेशरमच्या खड्डयात पूजन करुन आंदोलन सुरु करण्यात आले. यावेळी डफडे वाजवून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. या रोडने शिवाजी काँलेज, प्रियदर्शनी विद्यालय, बबनराव देशपांडे विद्यालय, जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळांचे शेकडो विद्यार्थी तसेच खाजगी ऑटो चालक, दुचाकी व बसच्या चालकांना वाहने चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते. या रोडबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करुन देखील ढेपाळलेल्या विभागांच्या अधिकाऱ्यांनी याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नव्हती. आज 4 नोव्हेंबर रोजी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन मामलकर, नगर सेविकापुत्र प्रदीप जैन, नगरसेवक पती कैलास खर्चे, विजय सुरडकर, नगर सेवक सलीम बाबा, आशीफ मेंबर तसेच पांचपांडे टेलर काही व्यापारी आंदोलनात सहभागी झाले होते.

आंदोलनाला यश, मात्र एकी दिसली नाही?
आठवडी बाजार ते मोताळा फाटा रोडला मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरीक, शालेय विद्यार्थी, व्यापारी, ऑटोचालक यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रस्त्यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन मामलकर यांच्या नेतृत्वात सुरु केलेले आंदोलन स्तुत्य होते. या आंदोलनाला यश आले खरे, परंतु या आंदोलनामध्ये काँग्रेसचे 12 नगर सेवक असतांना आंदोलनात मात्र 5 नगर सेवकच सहभागी झाल्याने काँग्रेसच्या आंदोलनात काँग्रेसचीच एकी मात्र दिसून आली नाही.

15 जूनचे आंदोलन प्रसिध्दी स्टंटच ?
बोराखेडी व धा.बढे पोस्टे.हद्दीत राजरोजपणे जोरात अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. परिणाम पोलिसांचा नागरिकांवरील वचक कमी झालेला असून चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून मोताळा तालुक्यातील बोराखेडी व धा.बढे पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या दोन्ही ठाण्याचे गावातील अवैध व्यवसाय त्वरीत बंद करण्यात यावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा 15 जून 2022 रोजी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन मामलकर, माजी सभापती गणेशराव पाटील, अ‍ॅड.विजयसिंग राजपूत, माजी सभापती मिलींद जैस्वाल, जि.प. सदस्य महेंद्र गवई, नगरसेवक सलीम चुनेवाले यांच्यासह आदींच्यावतीने तहसिलदार मोताळा, मुख्यमंत्री, गृहमंत्री व राज्य पालिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधिक्षक बुलडाणा यांना देण्यात आला होता. याला जवळपास 5 महिण्याचा कालावधी उलटला तरी अवैद्य धंद्याविरोधात आंदोलन झाले नसल्याने अवैद्य धंदे बंद झाले का? की तो प्रसिध्दी स्टंट होता का?? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहे.