रविवारी बुलडाण्यात न्याय्य मागण्यांसाठी बळीराजाची फौज धडकणार!

164

रविकांत तुपकरांचे नेतृत्व: प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज!!

बुलढाणा(BNUन्यूज) सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी आणि शेतमजुरांच्या न्याय्य हक्काच्या मागण्यासाठी जिल्ह्यातील गावाखेड्यातील बळीराजाची प्रचंड फौज ६ नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात धडकणार आहे. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात निघणारा हा एल्गार मोर्चा गर्दीचे उच्चांक मोडीत काढणार असून जिल्ह्यात सर्वीकडे मोर्चाचे वातावरण पेटले असून आता हे आंदोलन कोणते वळण घेते आणि रविकांत तुपकर या मोर्चात पुढील आंदोलनाची कोणती घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस विभाग देखील या मोर्चासाठी सज्ज झाला आहे.

सोयाबीन-कापसाच्या भावासह इतर न्याय्य मागण्यांसाठी रविवार ६ नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात एल्गार मोर्चा आयोजीत करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून या मोर्चाची जोरदार तयारी सुरु रविकांत तुपकरांनी जिल्हाभरात गावोगावी बैठका तसेच सभा वातावरण निर्माण करीत जिल्हाभरातून युवक, शेतकरी तसेच महिला उत्स्फूर्तपणे आणि स्वयंस्फुर्तीने या मोर्चात सहभागी होणार आहेत. गेल्या वर्षींच्या तुलनेत यावर्षीचा मोर्चा नवे रेकॉर्ड बनविणार असल्याचे सर्वीकडे चर्चा आहे. गेल्या वर्षी ३१ ऑक्टोंबर रोजी बुलढाण्यात एल्गार मोर्चा निघाला होता. त्यानंतर तुपकरांनी अन्नत्याग आंदोलन केले होते. राज्यभर आंदोलनाचा भडका उडाल्यानंतर राज्य सरकारला झुकावे लागल्याने राज्य सरकारने काही मागण्या मान्य केल्यानंतर रविकांत तुपकरांनी दिल्लीतही पाठपुरावा करत केंद्र सरकारकडून काही मागण्या मान्य करुन घेतल्याने सोयाबीनला ८ हजारापर्यंत तर कापसाला १२ हजारापर्यंत भाव मिळाला होता.

एल्गार मोर्चासाठी बळीराजाची फौज सज्ज..

शेतकरी चारही बाजुने संकटात सापडला असून सर्वांनीच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने शासन आणि प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांच्या मनात प्रंचड रोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचा हा रोष एल्गार मोर्चात दिसून येणार आहे. शासनाच्या सर्वच यंत्रणांसह राजकीय नेते व सर्वांचेच लक्ष या मोर्चाकडे लागून असून गतवर्षी या मोर्चाबाबत पोलिसांचा गर्दीचा अंदाज चुकला होता. यावर्षी गावोगावी मिळणारा प्रतिसाद पाहता पोलीस यंत्रणाही आधीच सतर्क झाली असून मागील वर्षाच्या मोर्चानंतर तुपकरांचे आंदोलन राज्यभर पेटले होते. यावर्षी या मोर्चात कोणती थिणगी पेटते, आंदोलनाची काय दिशा ठरते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. एल्गार मोर्चासाठी जिल्ह्यात बळीराजाची फौज सज्ज झाली सज्ज झाली आहे.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार..

एल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी बंदोबस्ताच्या दृष्टीने अतिरिक्त कुमक मागविली आहे. पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस, महिला पोलीस कर्मचारी, राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, दंगा काबू पथक मोर्चाच्या निमित्ताने तैनात राहणार असल्याची माहिती मिळतेय !