साहेब..मोताळा ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय अधिकारी देता काय?

316

शिवसेना आक्रमक; जिल्हा शल्य चिकीत्सकांना निवेदन!

बुलढाणा (BNUन्यूज)- मोताळा येथे नांदुरा रोडवर प्रशस्त असे ग्रामीण रुग्णालय शासनाने करोडो रुपये खर्च करुन  बांधले आहे. परंतु या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने गोरगरीबांना खाजगी रुग्णालयात उपचार करावा लागत असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याबाबत आज 14 नोव्हेंबर रोजी ठाकरे गट शिवसेनेचे घाटाखालील जिल्हा उपप्रमुख सुनिल घाटे व शिवसैनिकांनी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.तडस यांचेशी चर्चा करुन मोताळा येथे वैद्यकीय अधिकारी देण्याची मागणी केली. येत्या 7 दिवसात वैद्यकीय अधिकारी न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सुध्दा एका निवेदनाद्वारे देण्यात आला.

मोताळा हे तालुक्याचे ठिकाण असून येथे करोडो रुपये खर्च करुन प्रशस्त असे ग्रामीण रुग्णालय बांधण्यात आले आहे. परंतु येथे कित्येक दिवसापासून येथे वैद्यकीय अधिकारी यांची जागा रिक्त असल्याने गोरगरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असून त्यांना खाजगी महागड्या रुग्णालयात उपचार करावे लागत आहे. मोताळा हे तालुक्याचे ठिकाण असून शासनाच्यावतीने करोडो रुपये खर्च करुन नांदुरा मार्गावर ग्रामीण रूग्णालय तयार करण्यात आलेले आहे. सुरूवातीचा काळ सोडला तर सदरचे रूग्णालय आजारी असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे मध्यंतरी डॉ.अमोल पाटील यांच्याकडे वैद्यकीय अधिक्षकाचा पदभार होता. परंतु ते पुढील शिक्षणासाठी जात असल्याने पुन्हा या ग्रामीण रुग्णालयात गोरगरीबांची मोठी हेळसांड होणार आहे. याबाबत शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनिल घाटे व संजय हाडे, तालुका प्रमुख अनंता दिवाने, युवासेना उपजिल्हा प्रमुख शुभम घोंगटे, मंगेश सुरडकर, स्वप्निल घवंदे यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.तडस यांना सदर परिस्थीतीबाबत अवगत केले. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्याची ग्वाही दिली. परंतु मोताळा ग्रामीण रुग्णालयात खरचं 7 दिवसात वैद्यकीय अधिकारी नियुक्त न झाल्यास उपजिल्हा प्रमुख सुनिल घाटे व शिवसेना कार्यकर्ते गोरगरीबांसाठी खरचं आंदोलन करतील का, असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित केल्या जात आहे.