आठवडी बाजार ते मोताळा फाटा रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले !

331

सा.बां.विभागाने रोडचे डांबरीकरण केले; गतिरोधक केंव्हा टाकणार?

buldananewsupdate.com
मोताळा(18Dec.2022)आठवडी बाजार ते मोताळा फाटा रोडचे डांबरीकरण झाल्याने दुचाकी, चारचाकी तसेच खाजगी वाहन चालकांचा त्रास कमी झाला आहे. परंतु अनेक वाहनचालक आठवडी बाजार ते नांदुरा रोडवर धूम स्टाईलने वाहन चालवित असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. 4 ते 5 दिवसापुर्वी नांदूरा रोडवरील रविंद्र मशिनरी जवळ एक अपघात झाला होता, यामध्ये दुचाकी चालकासह रस्त्याने चालणारे तिघेजण जखमी झाले होते, तर 17 डिसेंबरला एका दुचाकीने दोन चिमुकल्यांना उडवून दिल्याने त्यांना सुध्दा मार लागलेला आहे. भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नांदूरा रोडवरील आठवडी बाजार ते मोताळा फाटा या 1 कि.मी.रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते यामुळे अपघाताचे प्रमाण सुध्दा वाढले होते. रस्त्यावरील गिट्टी उडून अनेकजण जखमी झाले होते. मोताळा शहरवासीयांचा त्रास दूर व्हावा यासाठी आ.संजय गायकवाड यांनी व्यापारी व नागरिकासमवेत काही दिवसापूर्वी ‘रास्ता रोको’ आंदेालन केल्याने काही तासातच रोडचे डांबरीकरण करण्यात आले. परंतु कित्येक वर्षांनी रोड समृध्दी महामार्गासारखा वाटत असल्याने व सदर रोडचे डांबरीकरण करतेवेळी या रोडवरील साई बुट हाऊस, प्रशांत किराणा, रविंद्र मशिनरी, स्टेट बँकेजवळ असलेले गतिरोधक कायम ठेवण्यात आले नसल्याने वाहन चालक सुसाट वेगाने वाहने चालवित असल्याने अपघात वाढले आहे. चार ते पाच दिवसापुर्वी एका अल्पवयीन दुचाकीस्वार मुलाने रविंद्र मशनिरीजवळ वयोवृध्द शांतीलाल कोटेचा व त्यांच्या पत्नीला धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना बुलढाणा येथील हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करावे लागले होते. तसेच 17 डिसेंबरला एका दुचाकी चालकाने दोन चिमुकले मुले सायकलने दळण आणण्यासाठी जात असतांना त्यांना परत मारोती सकूलजवळ उडवून दिल्याने त्यांना मुक्का मार लागला, सुदैवाने या दोन्ही अपघातात जिवीतहानी झाली नाही.

गतिरोधक टाकण्याची मागणी..
मोताळा ते नांदूरा या रोडने दोन म.प्रा.जिल्हा परिषद शाळा, स्व.बी.डी.विद्यालय, प्रियदर्शनी हायस्कूल, कन्या शाळा, शिवाजी विद्यालय तसेच खाजगी शाळेतील लहान-मोठे विद्यार्थी व शेकडो नागरिक ये-जा करतात. परंतु सदर रोडचे डांबरीकरण करतांना या रोडवर असलेले गतिरोधक काढून टाकण्यात आल्याने अल्पवयीन मुले व काही चारचाकी चालक धुम स्टाईलने वाहने चालवित असल्याने भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे सा.बां.विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देवून या रोडवर 4 ते 5 ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी होत आहे.