मोताळ्यात श्री पेट्रोल पंपाजवळ भिषण अपघात; 1 ठार

1239

@buldananewsupdate.com
मोताळा(23 Dec.2022) मृत्यू केंव्हा व कधी येईल हे सांगता येत नाही, जीवनाचे स्वप्न रंगवितांना त्याला कधी सामोरे जावे लागेल हे कळतच नाही. असाच एक भिषण अपघात आज 23 डिसेंबरच्या रात्री 8.45 वाजेच्या सुमारास मलकापूर-बुलढाणा रोडवरील श्री पेट्रोपंप व सहकार विद्या मंदीर जवळ मोताळा येथे घडला. अपघात एवढी भिषण होता की, यामध्ये दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाल्याने त्यामध्ये पिंपळखुटा येथील गजानन अढाव हे घटनास्थळी ठार झाले तर जखमी सोनवेणे यांना जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.

मलकापूर-बुलढाणा रोडवर सहकार विद्या मंदीरच्या डाव्या बाजुला श्री पेट्रोल पंप आहे. ट्रकचा चालक आपल्या वाहनामध्ये डिझेल भरुन बुलढाण्याकडे जात होता, दरम्यान याच रोडवरुन पिंपळखुटा येथील 50 वर्षीय गजानन अढाव हे आपल्या दुचाकीने अनिल सोनवणे यांच्या समवेत पिं.खुटा गावाकडे जात असतांना त्यांची व शेंगदाणा तेलाने भरलेले टॅकर यांच्या मध्ये समोरासमोर भिषण धडक झाली. धडक एवढी भिषण होती की, यामध्ये दुचाकीचा चुराडा झाला. अढाव हे टॅकरमध्ये फसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी काही नागरिकांनी 108 अ‍ॅम्बुलन्सला पाचारण केले असता कर्तव्यदक्ष चालक अंकुश वाघ काही मिनीटातच घटनास्थळी दाखल झाल्याने जखमी अनिल सोनवणे यांना पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिस कर्मचारी दाखल होवून त्यांनी मृतदेह बाहेर काढला टँकरला रस्त्याच्या बाजुला हटविले.