पिरीपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आत्मपरिक्षणाची गरज ??
संजय निकाळजे..
राहेरी बु. (BNUन्यूज) नवीन वर्ष सुरू झालं आणि राजकीय घडामोडी सुद्धा घडू लागल्या आहेत. त्यामध्येच पीपल्स रिपब्लिकन पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना अशी युती झाली. तशी घोषणा देखील दोन्ही पक्षाचे नेते अर्थात प्रा. जोगेंद्र कवाडे (Jogendra Kavade)व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केली. त्यानंतर कदाचित पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा बुलढाणा जिल्ह्यामध्ये पहिला कार्यक्रम हा नामांतर लढ्यातील शहिदांचा स्मृती सोहळा हा सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरीच्या पुलावर आयोजित करण्यात आला होता. मात्र या सोहळ्याला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार व आमदार यांचेसह भाजपाचे देखील आमदारांनी’दांडी’चं मारली. त्यामुळे हा प्रकार उपस्थित भीमसैनिक माता-भगिनींच्या लक्षात आल्यामुळे सभास्थळी उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते.
नवीन वर्ष 2023 सुरू झाले व राजकीय घडामोडींना देखील सुरुवात झाली. त्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे व कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांचेसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये युती संदर्भात चर्चा झाली ३ व ४ जानेवारी रोजी चर्चा झाल्यानंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी राज्याला चांगला धाडसी मुख्यमंत्री लाभला असून बाळासाहेबांची शिवसेनेसोबत युती केल्याची घोषणा केली व शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र आली असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रा.कवाडे हे आपलाच माणूस आहे, असं वाटते म्हणून एकत्र काम करून व युतीबाबत आनंद वाटतोय. त्यांचा आणि माझा पक्ष संघर्षातून पुढे आला असून हा साधा-सोपा संघर्ष नव्हता. दोन्ही पक्ष लोकांना न्याय देण्यासाठी एकत्र आले आहेत. प्रा.कवाडे यांचे माझे आधीपासूनच संबंध चांगले असून आता एक चांगली सुरुवात झाल्याची त्यांनी म्हटले. त्यांनी केलेले ओबीसी आंदोलन देशव्यापी होते तर त्यांनी लॉंग मार्च काढले. संघर्ष केला आणि ते आज इथपर्यंत आले. यापुढे महाराष्ट्रासाठी आम्ही सोबत राहून चांगले काम करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर त्यांच्या या युतीमुळे महाविकास आघाडीला धक्का मानला जात आहे. एवढे हे सारे असताना व बाळासाहेबांची शिवसेनेसोबत युती झाल्यानंतर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा बुलढाणा जिल्ह्यात सिनखेडराजा तालुक्यामध्ये राहेरीच्या फुलावर भव्य नामांतर स्मृती सोहळा 15 जानेवारीला होता. एकंदरीतच नव्यानेच युती झालेली असताना व माना सन्मानाने बोलवले असताना देखील यातील भाजपा व सेनेचे उपरोक्त एकही लोकप्रतिनिधी या सोहळ्यासाठी येऊ शकला नाही किंवा नामांतर लढ्यातील शहिदाप्रती कृतज्ञता किंवा आदरांजलीसाठी का बरे उपस्थित नसेल अशीच चर्चा या सोहळ्याच्या निमित्ताने भीमसैनिकांमध्ये ऐकायला मिळत होती. तर यामधून पिरीपाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी देखील आत्मचिंतनाची गरज निर्माण झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरु नये!
यांनी फिरविली पाठ..
या सोहळ्यासाठी उदघाटक म्हणून बाळासाहेबांची शिवसेनेचे खा.प्रतापराव जाधव हे होते. तर मेहकरचे आ. संजय रायमुलकर, बुलढाण्याचे आ. संजय गायकवाड यांच्यासह भाजपाचे ज.जामोदचे आ.संजय कुटे, खामगावचे आ. आकाश फुंडकर, चिखलीच्या आ. श्वेताताई महाले त्यांच्यासह मलकापूरचे माजी आ. चैनसुख संचेती, भाजपा नेते योगेंद्र गोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र या सर्वच लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी या स्मृति सोहळ्याकडे पाठ फिरवली.
यांची होती प्रामुख्याने उपस्थिती..
माजी आ. विजयराज शिंदे बुलढाणा, बाळासाहेबांची शिवसेनेचे माजी आ. शशिकांत खेडेकर सिंदखेडराजा, भाजपाचे प्रदेश प्रवक्ता विनोद वाघ, भाजपाचे डॉक्टर सेलचे डॉ. सुनील कायंदे यांनी मात्र हजेरी लावली, हे उल्लेखनीय!