मोकाट घोड्यांच्या बंदोबस्तासाठी मोताळ्यात ‘रास्ता रोको’ आंदोलन

237

घोडे मालकावर कारवाईनंतर आंदोलन थांबले!

BNU न्यूज नेटवर्क.
मोताळा (25 Jan.2023)आंदोलन कुणी करावे, का करावे… हे म्हणण्यापेक्षा न्यायासाठी आंदोलन करणे हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे. बावचळलेल्या घोड्यांच्या मालकावर कारवाईच्या मागणीसाठी 24 जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी एकवटीत मोताळा फाट्यावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले, यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करीत घोडेमालकावर गुन्हा दाखल केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

मोताळा तालुक्यातील मोताळा शहर, बोराखेडी, अंत्री, टाकळी(वाघजाळ), परडा ,शिरवा गावामध्ये चार ते पाच मोकाट घोड्यांनी हैदोस घालीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले होते. तसेच त्या घोड्यांना हाकलण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर सुध्दा घोड्यांनी जिवघेणा हल्ला केला होता. त्यातील जखमीवर उपचार सुरु आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. 22 जानेवारी रोजी शेख जाफर अब्दुल जब्बार बोराखेडी यांच्यावर घोड्यांनी हल्ला केला. प्रशांत तायडे बोराखेडी यांना सुध्दा घोड्यांनी मारले, दिलीप शिंदे यांना सुध्दा मारले आहे. 24 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता सय्यद मुबीन सय्यद कासम, शेख जाफर अब्दुल जाफर, शकील खान बरकत उल्लाखान, गुलाबराव धोरण, पंकज शेळके, प्रशांत तायडे, गजानन तायडे,दिलीप शिंदे, जनार्दन चौधरी, सचिन राणे, अजीज खान जब्बारखान, जुनेदखान गुलजार खान हे परवेज खान याच्या घोड्यांना पकडण्यासाठी गेले असता त्या घोड्यांनी सय्यद मुबीन सय्यद कासम यांना पोटावर, छातीवर लाथा मारल्याने मुका मार लागला आहे. तसेच शकीलखान बरकतउल्ला खान यांना सुध्दा मार लागला आहे. आरोपी परवेज खान याने त्याचे ताब्यातील घोडे हे लोकांच्या जिवीत्वास हानी पोहचविण्याच्या उद्देशाने मोकाट सोडून इजा पोहचविल्याप्रकरणी परवेज खान याच्यावर सनाउल्ला खान यांच्या फिर्यादीवरुन कारवाई केल्याने आंदोलन कर्त्यांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन मागे घेतले. पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहे.