तीन वर्षाच्या ब्रेकनंतर सैलानी यात्रा ‘रेकॉर्डब्रेक’ गर्दी खेचणार!

486

आरोग्य व पोलिस प्रशासन सज्ज; महाराष्ट्रासह देशाभरातून लाखो भाविक येणार

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (3 Mar.2023) जिल्ह्यातील सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेल्या सैलानी बाबा यात्रा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागील तीन वर्षापासून प्रशासनाने बंद ठेवली होती. यावर्षी मोठी यात्रा भरणार असून या यात्रेमध्ये महाराष्ट्रासह देशभरातील कानाकोपऱ्यातून जवळपास 6 लाखापेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी येणार असल्याची चर्चा असून या वर्षाची सैलानी यात्रा ही रेकॉर्डब्रेक भरणार असल्याच्या अंदाज व्यक्त केल्या जात आहे. सैलानी येथे राहुट्या उभारणीस सुरुवात झाली असून व्यावसायीकांनी आपले दुकानेही थाटली आहेत.

सैलानी यात्रेच्या पार्श्वभूमीवर 2 ते 17 मार्च दरम्यान वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून रायपूर, पिंपळगाव सराई, ढसाळवाडी, दुधा या मार्गावरील पार्यायी मार्ग रायपूर, मातला, केसापूर, माळवंदी दुधा या मार्गाने तसेच दुधा, घाटनांद्रा, ढासाळवादी, सैलानी, पिंपळगाव सराई, रायपूर या मार्गावरील वाहतूक दुधा, माळवंदी, केसापूर, मातला, रायपूर या पर्यायी वळविण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्यावतीने मोठी व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाच्यावतीने अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठी कंबर कसली असून मोठ्या अधिकाऱ्यांसह 750 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त केलेल्या पॉईंटवर पोलिस कर्मचारी नियुक्त केले आहे. वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी सैलानी बाबा ट्रस्टच्यावतीने पाण्याच्या ट्रॅकरची व्यवस्था करण्यात आली आहे. शे.रफिक मुजावर यांचे घरुन हजरत अब्दुल रहेमान उर्फ सैलानी शाह मिया यांची संदल मिरवणूक उंटीनीवरुन निघून दर्गाह येथे पोहचून चादर व संदलचा लेप लावून संदल १२ मार्च रोजी चढविण्यात येणार आहे. १६ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान सैलानी बाबा दर्गा याठिकाणी फातेहाखानी कार्यक्रम होणार आहे.