महिलादिनी न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका, आशा व गटप्रवर्तकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक !

1002

‘सीटू’च्या नेतृत्वात करण्यात आले आंदोलन

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (8 Mar.2023) खरचं काय हा योगायोग..आज 8 मार्च महिलादिन मोठा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आपल्या न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी ‘सीटू’ च्या नेतृत्वात अंगणवाडी, आशा, गटप्रवर्तक व शालेय पोषण आहार कामगार महिलानी आज 8 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीटूचे जिल्हाअध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड, सचिव प्रतिभाताई पाटील, सरला मिश्रा, माया वाघ, माया डिवरे, जयश्रीताई तायडे, ललिता बोदडे, मंदा डोंगरदिवे, कल्पना गवई अर्चना सोळंके, अनिता खडसे, निशाताई घोडे, यांच्या नेतृत्वात आणि वनमाला वानखेडे अश्विनी देशमुख,पुष्पलता खरात, सुनंदा मोरे, वैशाली चहाकर, अनिता वायाळ यांच्यासह शेकडो महिलांनी राज्य व केंद्र सरकारच्या महिला विरोधी धोरणाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत निदर्शने करुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणदणाणून सोडला होता.

राज्य सरकारचे आर्थिक बजेट उद्या 9 मार्च रोजी सादर केले जाणार आहे. या बजेटमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना राष्ट्रीय आरोग्य मिशन आणि मध्यान भोजन इत्यादी योजने मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक निधीची तरतूद करून या योजनेत काम करणाऱ्या लाखो महिलांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी मानधन वाढ, किमान वेतन, सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, ग्रॅज्युटी आणि पेन्शन इत्यादी मागण्याचा सरकारने तात्काळ विचार करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, यासह आदी मागण्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

दोनचार महिलांना पुरस्कार देण्याचे ढोंग..
सरकार एकीकडे चार दोन महिलांना विविध प्रकारचे पुरस्कार देऊन त्या महिला प्रति सन्मान व्यक्त करण्याचे ढोंग करत आहे. तर दुसरीकडे विविध योजनेत काम करणाऱ्या लाखो महिलांना अत्यल्प मानधन तथा मोबदला देऊन त्यांची आर्थिक पिळवणूक करते. गेल्या पाच वर्षापासून केंद्र सरकारने या योजना कर्मचाऱ्यांच्या मानधनात एक रुपयाची सुद्धा वाढ केलेली नाही, असा आरोप आंदोलन कर्त्यांच्यावतीने करण्यात आला आहे.

घोषणाबाजीने जिल्हाधिकारी परिसर दणाणला..
यावेळी अंगणवाडी सेविका, गटप्रर्वतक, आशा यांनी मानधन वाढ आमच्या हक्काची… पेन्शन आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे…! असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही….हम भारत की नारी है…फूल नही चिंगारी है…देश के सरकार होश मे आव… या सरकारचे करायचं काय? आदी घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला होता.

दिल्ली संसदेवर भव्य मोर्चा काढणार-कॉ.पंजाबराव गायकवाड
एप्रिल महिन्यात केंद्र सरकारच्या विरोधात कामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला यांच्या संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात ५ एप्रिल रोजी दिल्ली येथे संसदेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील जास्तीत-जास्त अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा व गटप्रवर्तक, आणि शालेय पोषण आहार कामगार महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन, संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी केले आहे.