नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्या- जयश्रीताई शेळके

258

मोताळा तालुकयातील मुर्ती येथील नुकसानीची केली पाहणी

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (28.Apr.2023) अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या तालुक्यातील मूर्ती येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्रीताई शेळके यांनी २७ एप्रिल रोजी भेट देऊन पाहणी केली. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तात्काळ मदत देण्याची मागणी त्यांनी मोताळा तहसिलदारांकडे केली आहे.

जिल्ह्यातील काही भागात २६ एप्रिल रोजी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने हजेरी लावली. त्यामुळे पिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील मूर्ती येथे २६ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यास सुरुवात झाली. साधारण अर्धा तास गावावर नैसर्गिक संकट घोंगावत होते. यामध्ये अनेक घरांची पडझड झाली. कित्येक घरांवरील टीनपत्रे उडाली. त्यामुळे घरातील साहित्य आणि साठवून ठेवलेला शेतमाल भिजला. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वादळी वारा आणि अवकाळी पावसाने शेतातील उन्हाळी मका पिकाचे सुद्धा प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्रीताई शेळके यांनी 27 गुरुवारी मूर्ती येथे भेट दिली. नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. तसेच तहसीलदार यांच्यासोबत बोलून नुकसानग्रस्त नागरिकांना तत्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी राजेंद्र सोनुने, सरपंच श्रीकृष्ण खराटे, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश खाकरे, मारोती खाकरे, रवी सुरडकर, महादेव खाकरे, रामभाऊ क्षीरसागर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मोताळा तालुक्यात 16 गावामध्ये झाले नुकसान

बुधवार 26 एप्रिल रोजी आलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे मोताळा तालुक्यातील टाकळी-वाघजाळ, , रोहिणखेड, मुर्ती, जयपूर-कोथळी, तरोडा, पान्हेरा, खंडवा, आडविहीर, राजूर, मोताळा, वारुळी, चिंचपूर, परडा, धा.देशमुख, अंत्री, हरमोड या गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे जवळपास 297.8 हेक्टर क्षेत्र बाधीत होवून त्यामध्ये 490 शेतकऱ्यांचे मका, कांदा, फळबाग पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.