कोथळी-तरोडा-तारापूर शिवारात 2 बैल व 1 गायीचा बिबट्याने पाडला फडशा !

728

2 शेतकऱ्यांचे दिड लाखाचे नुकसान

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (29Apr.2023) मोताळा तालुक्यात हिंस्त्र वन्यप्राण्यांचा मोठा हैदोस वाढला आहे. तरोडा शिवारात तरोडा येथील प्रल्हाद दलपत येरवाळ यांच्या दोन बैलावर बिबट्याने हल्ला करुन त्यांचा फडशा पाडला आहे. सदर घटना 21 मार्च रोजी घडली होती. तर कोथळी येथील तुलशिदास मनोहरदास राठी यांच्या लाल रंगाच्या गिरजातीच्या कालवढ गायीवर 28 एप्रिल रोजी तारापूर शिवारात गट नं.110 मध्ये हल्ला करुन तिला ठार मारल्याची घटना घडली. बिबट्यांच्या हैदोसामुळे कोथळी व तरोडा शिवारात मोठी दहशत निर्माण झाली आहे.

तरोडा येथील प्रल्हाद दलपत येरवाळ यांनी गट नंबर 19 मध्ये बांधलेल्या एका बैलावर बिबट्याने 21 मार्च रोजी हल्ला करुन त्यांचा ठार केला तर परत दोन दिवसांनी पुन्हा दसऱ्या बैलावर हल्ला करुन दुसरा बैल सुध्दा फस्त केला आहे. सदर घटनेचा मोताळा वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.)मोताळा कार्यालयात तक्रार दिली परंतु वनपाल सानप यांनी कोणत्याच प्रकारचा स्थळ पंचानामा केला नसून पशुवैद्यकीय अधिकारी मोताळा यांचे प्रमाणपत्रासाठी अहवाल सादर न करताच सानप यांनी 5 एप्रिल रोजी अर्ज खारीज करण्यात आला. यावेळी अर्जदाराने वनपरिक्षेत्र अधिकारी मुरकुटेची भेट घेतली असता त्यांनी वनपाल सानपला भेटण्याचा सल्ला देवून बाजी मारुन घेतली.

कोथळी येथील तुलशिदास मनोहरदास राठी यांचे तारापूर शिवारात गट नं.110 मध्ये गुरांचा गोठा आहे. त्या गोठ्यात त्यांनी 4 बैल, 1 म्हैस, 3 गाई, 2 गोऱ्हे व वासरे बांधलेली होती. शुक्रवार 28 एप्रिल रोजी सकाळी 3 ते 4 वाजेच्या सुमारास त्यांच्या गोठ्यातील जनावरांवर बिबट्याने 3 वर्षाच्या लाल-तांबड्या रंगाची गिरजातीची कालवढ गायीवर हल्ला करुन बाजुच्या शेतात नेवून तिला फस्त केली. यामुळे तुलशिदास राठी यांचे जवळपास 15 ते 20 हजाराचे नुकसान झाले आहे. सदर घटनेचा स्थळ पंचनामा वनपाल सानप यांनी केला करुन मोताळा वनपरिक्षेत्र कार्यालयाला अहवाल सादर केला आहे.

  • बिबट्याने 1 महिन्याच्या कालावधीमध्ये 3 जनावरे ठार केल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. याकडे कर्तव्यदक्ष वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देवून सदर हिंस्त्र वन्यप्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.