देशी दारु दुकानाविरोधात शेकडो महिलांची बोराखेडी पोस्टे.मध्ये धडक!

87

दुकान शहराबाहेर हटवा; पोलिस व न.पं.प्रशासनास दिले निवेदन

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (13.JULY.2023) दारुमुळे शासनाला लाखो-करोडोचा महसूल मिळतो, परंतु दारु पिणाऱ्या ‘बेवड्यांचा’ दारुच्या दुकानाजवळ असलेल्या रहिवाश्यांना मोठा प्रमाणात त्रास होतोय. याबाबत स्थानिक पोलिस व नगर पंचायत प्रशासनास सांगून सुध्दा काहीच उपयोग होत नसल्यामुळे आज गुरुवार 13 जुलै रोजी नगर सेवक शेख साजिद शेख सुपडू यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी बोराखेडी पोलिस स्टेशन व नगर पंचायतवर धडक देवून प्रभाग क्र. 4 मधील देशी दारुचे दुकान इतरत्र हलविण्याची मागणी केली आहे.

मोताळा हे तालुक्याचे ठिकाण आहे, येथे गुरुवारी मोठा आठवडी बाजार भरतो. नांदुरारोडवर बाजारात शासकीय ग्रामीण रुग्णालय आहे. त्याच्या पाठीमागे देशी दारुचे दुकान आहे. मोताळा शहरातंर्गत येणाऱ्या प्रभाग क्र.4 मध्ये जाणारा मुख्य रस्ता आठवडी बाजार चौक ते रफिकसेठ यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेकजण अतिक्रमण करुन राहत आहेत. या अतिक्रमणामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. तर दुसरीकडे याच प्रभागामध्ये एक देशी दारुचे दुकान असल्यामुळे शाळकरी 13 ते 14 वर्ष वयोगटातील मुले हे मोठ्या प्रमाणात दारुच्या आहरी गेलेले आहेत. तसेच दारु पिणाऱ्यांचा महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो, दारुडे अश्लील भाषेत शिवीगाळ करत असल्यामुळे नेहमी भांडणे होत असतात, यामुळे मोठी अनुचित घटना सुध्दा घडू शकते. सदर देशी दारुचे दुकान वेळेव्यतीरिक्त सुरु राहत असल्याने दारुडे मोठ्या प्रमाणात दांगडो करतात, सदर देशी दारुचे दुकान प्रभाग क्र.4 मधून इतरत्र हलविण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर नगर सेवक शेख साजिद शेख सुपडू यांच्यासह शेकडो महिला व पुरुषांच्या स्वाक्षऱ्या आहेत.