मोताळा- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत स्वच्छता रन व ग्रामपंचायत विभागामार्फत अमृत कलश यात्रेचे आयोजन ग्रामपंचायत सिंदखेड तालुका मातळा येथे पार पडले. यावेळी आ.संजय गायकवाड हे उपक्रमांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी सरपंच प्रवीण कदम, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकळे, मोताळा पं.स.चे गटविकास अधिकारी समाधान वाघ हे उपस्थित होते.
सद्यस्थितीत केंद्र शासनामार्फत मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत अमृत कलश यात्रेचे आयोजन जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत केले जात आहे. मोताळा तालुक्यातील याचाही शुभारंभ सिंदखेड येथून करण्यात आला. यावेळी गावाचा एक अमृत कलश तयार करण्यात येऊन ज्यांच्याकडे शेती आहे अशा कुटुंबाची शेतातातील माती व ज्यांचेकडे शेती नाही अशा कुटंबाकडून चिमूटभर तांदूळ घरोघरून या कलशात संकलित करण्यात आले. कलशा व्यतिरिक्त संकलित झालेली माती गावातीलच अमृतवाटिकेसाठी वापरली जाणार आहे. या अनुषंगाने स्वच्छता रण व अमृत कलेश यात्रेच्या या उपक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आ.संजय गायकवाड यांनी स्वच्छता हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे, स्वच्छतेमुळे आपले आरोग्य सुदृढ राहून आपले गाव स्वच्छ व सुंदर ठेवून गावाचा शाश्वत विकास साधता येऊ शकतो. यासाठी गावातून कचऱ्याला हद्दपार करणे गरजेचे आहे. अमृत कलश यात्रेच्या निमित्तानेही त्यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले. शासनाच्या या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग देऊन कचरामुक्त गाव म्हणजेच कचरामुक्त भारत ही संकल्पना प्रत्यक्षात रुजविण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन आ.गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमास मोताळा पं.स.ग्रामविकास्तार (ग्रामपंचायत) राजेंद्र तायडे व अशोक काळे, विस्तार अधिकारी (आरोग्य) मधुकर तायडे, ग्रामसेवक वैराळकर, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सल्लागार व तालुका स्तरावरील गट समन्वयक व समन्वय समन्वयक यांची उपस्थिती होती.
लोकसहभागामुळे गावातील वातावरण झाले स्वच्छतामय
जि.प.सीईओ. भाग्यश्री विसपुते यांचे मार्गदर्शनात जिल्ह्यात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान जोमाने राबविले जात आहे. त्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व पंचायत समिती मोताळा अंतर्गत मोताळा तालुक्यातील सिंदखेड ग्रामपंचायत उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सार्वजनिक ठिकाणी व इमारतींची साफसफाई आधी स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांचे हातातील स्वच्छतेचे फलक त्यांनी दिलेल्या स्वच्छता व पर्यावरण, प्लास्टिक बंदी आदी घोषणा, लेझीम, प्रभात फेरी, यामध्ये ग्रामस्थांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग यामुळे गावातील वातावरण पूर्णपणे स्वच्छतामय झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.