एक तारीख एक तास स्वच्छतेसाठी जिल्ह्यात श्रमदान सर्व गावांनी सहभागी व्हावे-भाग्यशी विसपुते

68

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (28.Sep.2023) स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत तारीख 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात जोमाने राबविले जात आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात एकाच वेळी प्रत्येक गावात, वाड्या वस्त्यांवर 1 ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक 10 वाजता एक तास स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे. बुलढाणा जिह्यात सुद्धा हीं मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून या मोहिमेत सर्व गावांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे.

कचरामुक्त गाव, कचरामुक्त भारत या संकल्पनेवर आधारित या अभियानात जिल्ह्यात दिवसनिहाय विविध उपक्रम राबविले जात आहे. त्यास उत्स्फूर्त प्रतिसादही प्रत्येक गावातून मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून स्वच्छता ही सेवा मोहिमेतंर्गत एक ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता एक तारीख एक तास श्रमदान मोहीम हा उपक्रम जिह्यात राबविला जाणार आहे. यात एक ऑक्टोबरला सकाळी दहाला जिल्ह्यातील सर्व नागरिक तसेच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येक वॉर्ड, ग्रामपंचायतींमध्ये श्रमदानाद्वारे स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. या मध्ये प्रत्येक गावात दुष्यमान स्वच्छेतेसाठी सर्व सार्वजनिक ठिकाणे, बसस्थानक, तलाव, नदीकाठ, बाजारपेठ, धार्मिक व पर्यटन स्थळे, शाळा, अंगणवाडी परिसर आदी सर्व ठिकाणी हीं श्रमदान मोहीम राबविण्यात येऊन स्वच्छता करण्यात येणार आहे. या उपक्रमाकरिता जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख नोडल अधिकारी म्हणून तालुक्यांना येणार आहेत. तसेच पंचायत समिती स्तरावर अधिकारी व कर्मचारी देखील एक एका गावात उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमासाठी शासनाचे संकेतस्थळावर इव्हेंट निर्माण करण्यात येत असून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती व फोटो अपलोड करण्यात येणार आहे.

या श्रमदान मोहिमेत गावातील सर्व लोकप्रतिधी, सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी, युवक, युवती, सर्व बचत गटाचे सदस्य, विद्यार्थी आदी सर्व घटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले असून तशा सूचना अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या आहेत.