नुकसानीच्या मदतीसाठी आधार बायोमेट्रीक अपडेट करावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

68

केवायसीनंतर मदतीची रक्कम १५ दिवसात जमा होणार

बुलढाणा(1 oct.2023 शासकीय माहिती) शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदतीची रक्कम विनाविलंब मिळण्यासाठी बँक खाते आधारशी लिंक करावे, तसेच आधार बायोमेट्रीक अपडेट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक नसल्यामुळे आधार प्रमाणीकरण करूनही बँक खात्यात रक्कम जमा झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच काही शेतकऱ्यांचे आधार निष्क्रिय झाले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या आधारला दहा वर्षे झाले असून त्यांनी आधारमध्ये कोणतेही अपडेट केलेले नाही, त्यांनी सर्वप्रथम आधार केंद्रातून आधार बायोमेट्रीक अपडेट करावे लागणार आहे. आधार बायोमेट्रीक अपडेटसाठी फक्त आधारकार्ड आणि व्यक्ती स्वतः हजर असणे आवश्यक आहे. आधार दस्तऐवज अपडेट आणि आधार केवायसीसाठी मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड आणि राशन कार्डसोबत आधारकार्ड आवश्यक असून स्वतः व्यक्ती हजर असणे आवश्यक आहे. या दोन्ही प्रक्रिया फक्त आधार केंद्रावरच होतात. बँकेत केलेल्या केवायसीशी आधार केवायसीचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे आधार अपडेट आणि आधार डॉक्युमेंट अपडेट, आधार केवायसी हे आधार केंद्रावरच करता येते. बँकेत जाऊन खात्याला आधार संलग्न हे बँकेत जाऊनच करावे लागते.

मदतीची रक्कम मिळविण्यासाठी आधार केवायसी करून आधार दस्तऐवज अपडेट करावे. त्यानंतर बँकेत जाऊन बँक खात्याशी आधार संलग्न करून घेणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शासन स्तरावरून पंधरा ते वीस दिवसांत मदतीची रक्कम आपोआप आधार लिंक खात्यात जमा होणार आहे.