बुलढाणा(10 Nov.2023)-मतदार नोंदणी अभियानाच्या जनजागृतीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय ते चिखली तालुकापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या वतीने सायकल रॅलीद्वारे प्रचार केला. या रॅलीला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयापासून आज सकाळी सहा वा. सायकल रॅली सुरु झाली. यामध्ये जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, बुलढाणा सायकल ग्रुप व विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार सुरेश कवळे, नायब तहसीलदार संजय टाके, संजय बंगाळे, कारागृह अधिक्षक आव्हाळे आदी उपस्थित होते. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरु होवून जयस्तंभ चौक संगम चौक बस स्टॅण्ड, चिंचोले चौक, चिखली रोड सहकार विद्या मंदिर मार्गाने चिखलीपर्यंत तेथून परत जिल्हाधिकारी कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. या सायकल रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. आगामी काळातील निवडणूका लक्षात घेऊन नवमतदार, दिव्यांग, विमुक्त भटक्या जमाती, आदिवासी जमाती, महिला, तृतीयपंथी आदिसाठी मतदार नोंदणी शिबिरे व विविध उपक्रमांद्वारे मतदार नोंदणी करण्यात येत आहे. जिल्हा व तालुक्यातील नव मतदारांनी मतदान नोंदणी करावी. तसेच आपल्या शेजारी, गावातील ओळखीचे 1 जानेवारी 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या युवक युवती व नागरिकांना मतदार नोंदणीसाठी प्रवृत्त करावे व मतदार नोंदणीचा टक्का वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.