स्थागुशाची अवैध बायोडीजल विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई; मलकापूर व चिखली तालुक्यात पकडला 34.20 लाखाचा मुद्देमाल

68

बुलढाणा: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हा शाखेने जिल्ह्यात चिखली व मलकापूर ग्रामीण हद्दीत नऊ जणांवर धडक कारवाई करीत त्यांच्याकडून 23 लक्ष 25 हजार 715 रुपये किमतीचे 31 हजार 405 लिटर बायोडीजल व इतर साहित्य 10 लक्ष 94 हजार 570 रुपये असा एकूण 34 लक्ष 20 हजार 295 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई 30 मार्च रोजी करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध बायोडीजल विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

चिखली तालुक्यात चिखली येथील किसान बायो डीजल येथे धाड टाकून 7000 हजार बायोडीजल 5 लक्ष 4 हजार रुपये व इतर साहित्य असा 7 लक्ष 15 हजाराचा मुद्देमाल जप्त करुन सचिन रामकृष्ण लोखंडे तसेच काठोडे ट्रेडर्स चिखली येथे धाड टाकून ज्ञानेश्वर सारजुबा काठोळे खैरव ता.चिखली यांच्या ताब्यातून 2400 लिटर बायोडीजल 1 लक्ष 92 रुपयासह 3 लक्ष 92 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. मलकापूर तालुक्यात ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत कारवाई करीत हॉटेल न्यू सहयोग लगत, नॅशनल हायवे धानोरा शिवार हायवे क्र.6 येथे कारवाई करीत नफीस खान नासीर खान वडनेर भोलजी यांच्याकडून 15 हजार बायोडीजल 12 लक्ष 75 हजार व इतर असा 15 लक्ष 5 हजार 50 रुपये, मलकापूर एमआयडीसी हद्दीत हॉटेल निसर्गच्या बाजूला महामार्ग 53वर कारवाई करीत हेमंम ज्ञानेश्वर काचकुरे रा.तालसवाडा व परमेश्वर कैलास वनारे रा.माकनेर याच्याकडून 445 लिटर बायोडीजल 33 हजार 375 रुपयासह इतर असा एकूण 1 लक्ष 62 हजार 275 रुपयांचा मुद्देमाल, दसरखेड येथील पदमनी प्रभाकर महाराज यांच्या शेतात कारवाई करीत शेख जावेद शेख सलीम व शेख जायेब शेख रशीद दोन्ही रा.मलकापूर यांच्याकडून 1610 लिटर बायोडीजल 1 लक्ष 20 हजार 750 रुपये व इतर असा एकूण 3 लक्ष 67 हजार 350 रुपये, हॉटेल अमनचे बाजुला महामार्ग क्र.53 दसरखेड शिवारात मो.जिया मो.युसूफ व गुरफान खान गफार खान दोन्ही मलकापूर यांच्यावर कारवाई करीत त्यांच्याकडून 2950 लिटर बायोडीजल किंमत 2 लक्ष 600 रुपये व इतर 2 लक्ष 75 हजार 320 रुपये असा एकूण 34 लक्ष 20 हजार 295 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी उपरोक्त नऊ आरोपींवर चिखली व मलकापूर ग्रामीण पोलिसांत भादंवीचे कलम 285 सह 3, 7 ईसी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

31 हजार 405 लिटर बायोडीजल जप्त

अवैध बायोडीजल विक्री करणाऱ्या नऊ जणांवर धडक कारवाई करीत 23 लक्ष 25 हजार 715 रुपयांचे 31405 लिटर अवैध बायोडीजल व इतर 10 लक्ष 94 हजार 570 रुपये असा एकूण 34 लक्ष 20 हजार 295 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

चिखली व मलकापूर ग्रामीण पोलिस हद्दीत सदर कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक सुनिल कडासणे, अपर पोलिस अधिक्षक अशोक थोरात, बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनात स्थागुशा पोलिस निरिक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात स्थागुशा सपोनी.विलासकुमार सानप, आशिष चवरे, पारपत्र विभागाचे श्रीधर घट्टे, पोउपनी.श्रीकांत जिंदवामर, सचिन कानडे, रवी मोरे व गुन्हे शाखा बुलढाणा यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे.
000000