आझाद हिंदने केली ज.जामोद दंगलीच्या चौकशीची मागणी
बुलढाणा: जळगाव जामोद येथे 17 सप्टेंबर रोजी घडलेल्या दंगलीची सीबीआय चौकशी करुन मोबाईल टावर लोकेशन, सीडीआर तपासल्यास सदर दंगल जाणीवपूर्वक स्थानिक राजकीय लोकप्रतिनीधींनी घडविल्याची बाब समोर येईल, अशी मागणी आझाद हिंद संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील ज.जामोद येथे 17 सप्टेंबर रोजी गणपती उत्सवादरम्यान तणाव निर्माण करुन दंगल घडविण्यात आल्याचा संशय आझाद हिंद शेतकरी संघटनेने व्यक्त करीत सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज, दंगल दरम्यानचे पोलिस स्टेशन तसेच पत्रकारांकडे असलले व्हीडिओ, मोबाईल टावर लोकेशन तसेच सीडीआरची तपासणी करण्यात यावी, सदर बाबी पोलिसांनी तपासल्यास सदर दंगल ही जाणीवपूर्वक स्थानिक राजकीय लोकप्रतिनिधींनी घडवून आणल्याची बाबत समोर येईल , असे निवेदनात म्हटले आहे. मात्र, त्यांनी सदर आरोप कोणत्या स्थानिक राजकीय लोकप्रतिनिधीवर केला याचा उल्लेख मात्र निवेदनात करणे टाळले. तसेच आझाद हिंद संघटनेने सदर घटनेची सीबीआय चौकशी करुन दोषीवर कारवाईची मागणी करीत निर्दोष व्यक्तीवर दाखल केलेले गुन्हे खारीज करण्याची मागणी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनावर आझाद हिंद शेतकरी संघटना राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.सतिषचंद्र रोठे यांच्यासह अस्लम शाह, याकुब पठाण, शेख सईद, लिकायत खान, उमाताई बोचरे, राजेंद्र ससाणे, वर्षाताई ताथरकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.