बिबट्याचा हल्ल्यात शेतकरी जखमी;आरडाओरड केल्याने वाचले प्राण

31

मोताळा तालुक्यातील नळकुंड येथील घटना!!

मोताळा: बिबट्याच्या हल्ल्यात 55 वर्षीय शेतकरी जखमी झाल्याची घटना 26 सप्टेंबरच्या सकाळी 3.30 ते 4 वाजेच्या सुमारास नळकुंड शेतशिवारात घडली. दैव बलवत्तर म्हणून पुढील अनर्थ टळला. जखमी शेतकऱ्याचे नाव सुभाष बावस्कर असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे उपचार सुरु आहेत.

मोताळा वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील नळकुंड येथे गट क्र.16 मध्ये 55 वर्षीय शेतकरी सुभाष किसन बावस्कर हे शेतातील घरात झोपलेले होते. दरम्यान 26 सप्टेंबरच्या सकाळी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान घराचा दरवाजा उघडा असल्याने त्यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला चढविला. बिबट्याच्या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. मात्र, यावेळी सुभाष बावस्कर यांनी आरडा-ओरड केल्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला. सदर घटनेची माहिती मिळताच मोताळा प्रादेशिक वनविभागाचे वनक्षेत्रपाल काळे, वनपाल जगतापर, वनरक्षक कैलास तराळ यांनी घटनास्थळी धाव घेवून घटनास्थळाचा पंचानामा केला. यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जखमी सुभाष बावस्कर यांना जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल केले. सदर घटनमुळे नळकुंडसह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी दशहत निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडून हिंस्त्र वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.