कोळी महादेव’ समाजाचे नळगंगा धरणात जलसमाधी आंदोलन ! तहसिलदार हेमंत पाटील यांच्या लेखी आश्वासनाने आंदोलन तुर्तास स्थगित!!

11

मोताळा- आदिवासी कोळी महादेव जमातीला 1950चा पुरावा न मागता अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सरसकट देण्यासाठी उपविभागीय अधिकारी मलकापूर यांनी कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्यामुळे समाज बांधवांच्यावतीने प्रशासनाला निवेदन देवून शनिवार 5 ऑक्टोबर रोजी जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी गणेश इंगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनाचे गांर्भीय पाहता मोताळा तहसिलदार हेमंत पाटील यांनी आंदोलनस्थळी पोहचून 15 ऑक्टोबर उपविभागीय अधिकारी, मलकापूर यांच्यासोबत बैठक लावण्याचे लेखी आश्वासन दिल्याने दुपारी 2 वाजेच्या सुमारास आंदोलन तुर्तास स्थगीत करण्यात आले.

न्यायासाठी आंदोलन करणे हा गुन्हा नाही, तसा अधिकार सुध्दा राज्यघटनेने नागरिकांना दिला आहे. कायद्याच्या चौकटीत राहून कोळी महादेव समाजबांधवांच्यावतीने सरकार व प्रशासनाकडे निवेदन, आंदोलन, उपोषण व मोर्चाच्या माध्यमातून पाठपुरावा करुन देखील न्याय मिळत नसल्याने आज 5 ऑक्टोबर रोजी समाज बांधव जलसमाधी आंदोलनासाठी समाजबांधव मोठ्या संख्येने नळगंगा धरणावर पोहचले. यावेळी पोलिसांनी गणेश इंगळे यांना ताब्यात घेतले. यावेळी संतप्त समाजबांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामध्ये या आंदोलनामध्ये गजानन धाडे ,दीपक जाधव , संभाजी गवळी, वासुदेव सोनवणे, विजय बाम्हंदे ,किसन बावस्कर ,संजय जाधव, गोपाल धाडे, शुभम घुले, सुखदेव तायडे ,भारत झाल्टे उमेश जाधव, संदीप सपकाळ, किशोर गवळी ,अमरदीप तायडे, मनोहर भोलनकर, मंगेश इंगळे ,ज्ञानेश्वर सोनवणे ,संदीप जाधव, समाधान मघाडे ,ज्ञानदेव भोलनकर ,लखन सपकाळ सहभागी झाले होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने नळगंगा धरणाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. यावेळी गंगाधर तायडे यांनी मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला दिला. यावेळी ज्ञानेश्वर खवले, डी.एस.सपकाळ, सुरज झाल्टे, अरविंद भोलवणकर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

समाजबांधवांनी धरणात घेतल्या उड्या !

पोलिसांनी गणेश इंगळे यांना नळगंगा धरणाच्या पात्राजवळ ताब्यात घेतले. यावेळी आंदोलनावर ठाम असलेल्या गंगाधर तायडे नेतृत्वातील एका गटाने पोलिसांना हुलकावणी देऊन धरणामध्ये उड्या घेतल्या. मात्र, नदीपात्रात अगोदरच एसडीआरएफचे जवान बोटसह उपस्थित असल्यामुळे पाण्यात उड्या घेतलेल्या बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले. एसडीआरएफचे पथक नसते तर मोठा अनर्थ घडला असता. यावेळी बोराखेडी पोलिस मोठ्या संख्येने हजर होते.

तहसिलदारांनी सांभाळली कमान

मलकापूर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कारभारावर नाराज असलेल्या आदिवासी कोळी महादेव समाज बांधवांनी रोष व्यक्त केला. जलसमाधी आंदोलन त्यातच उपविभागीय अधिकारी पुणे येथे प्रशिक्षणासाठी गेल्याने तहसिलदार हेमंत पाटील यांनी कमान संभाळीत 14 किंवा 15 ऑक्टोबरला उपविभागीय अधिकाऱ्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन देवून समाजबांधवांना शांत केले.