बुलढाणा: निवडणूक म्हटले की, जय पराजय आलाच. यावेळी महायुतीकडून शिवसेनेचे संजय गायकवाड व महाविकास आघाडीकडून उबाठा शिवसेनेच्या अॅड.जयश्रीताई शेळके निवडणूक लढवित आहे. दोघांच्या नावामध्ये असलेल्या ‘जय’ शब्दामुळे त्या दोघांमध्येच ‘काटेकी टक्कर’ होणार असून अॅड.जयश्रीताईच्या पदरी सहानुभूती पडते, की संजुभाऊ गायकवाड यांनी मतदारसंघाचा केलेला कायापालट, विजयश्री कोण खेचून आणते, हे मात्र 3 लक्ष 7 हजार 106 मतदारांच्या हाती आहे.
आमदार झाल्यापासून संजय गायकवाड यांनी करोडो रुपयांचा निधी खेचून आणीत विविध विकास कामे मार्गी लावली, ते ही सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेवून… ! विकासकामे करतांना त्यांनी भेदभाव केला नाही. आजरोजी त्यांनी केलेला मतदार संघाचा कायापालट हा वाखण्याजोगा आहे. विद्यार्थी, गोरगरिब व शेतकऱ्यांच्या मदतीला धावून त्यांनी अनेकांना आर्थिक मदत करीत त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली आहे. मतदार संघातील कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिकांच्या सुख, दु:खात सहभागी होवून त्यांनी तोरणादारी, मरणादारी लावलेली हजेरी, सामान्य कार्यकर्त्यासोबत असलेला दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे.
अॅड. जयश्रीताई शेळके यांनी बचतगट तसेच शेतकरी, गोरगरीब नागरिकांच्या न्याय्य हक्कासाठी केलेले आंदोलने, महिलांना बचतगटाच्या माध्यमातून दिलेल्या कर्जपुरवठ्यामुळे अनेक महिलांना रोजगार निर्मिती झाल्याने त्यांचे संसार फुलले. ताईंचे पती सुनिल शेळके मोताळा तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार असतांना माँ साहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले, ज्योतीबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज , शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजप्रबोधनाद्वारे नागरिकांपर्यंत पोहचून त्यांनी बहुजन समाजाला जोडले. हे जयश्रीताईंसाठी जमेची बाजू आहे.
बुलढाणा मतदार संघाला ‘परिवर्तना’चा इतिहास आहे. मात्र, विकासकामांमुळे एका अल्पसंख्यांक समाजाचे विजयराज शिंदे यांनी परिवर्तनाचा इतिहास मोडीत काढत लगातार दोनवेळा आमदार होण्याचा बहुमान मिळविला आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये जातीच्या नावावर उमेदवार निवडून दिल्या जातो, असे म्हणता येणार नाही. कारण शिंदेंना मतदारांनी तीनवेळा आमदार म्हणून निवडून दिल्याने ‘जात पॅटर्न’ सुध्दा खोटा ठरल्याचा प्रत्येय निकाल्याच्या माध्यमातून सिध्द झाला आहे.
मतदारांची पक्षालाच प्रथम पसंदी
बुलढाणा विधानसभा मतदार संघामध्ये 57 वर्षाच्या कालावधीमध्ये मतदारांनी अपक्ष उमेदवारांना कौल दिला नसल्याचा इतिहास आहे. 2024 च्या होवू घातलेल्या निवडणुकीत सक्षम अपक्ष उमदेवार नसल्यामुळे यावेळी सुध्दा आमदार राजकीय पक्षाचाच असून तोही घाटावरचाच असेल. मतदार संघामध्ये संजय गायकवाड यांनी दोनवेळा अपक्ष निवडणूक लढवित 1999 मध्ये त्यांनी 5360 मते, तर 2004 च्या निवडणुकीत 32 हजार 351 मते घेतली होती. 2014 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून निवडणूक लढवित संजय गायकवाड हे 35 हजार 324 मते घेवून द्वितीयस्थानी होते. 2019 निवडणुकीत शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवित 67 हजार 785 एवढे ‘रेकॉर्ड ब्रेक’ मते घेवून विजयी झाले होते.