विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश !!
बुलढाणा: जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुका खुल्या, भयमुक्त व निर्भय वातावरण व शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 135 (सी ) तसेच मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 नुसार सर्व अबकारी अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी दिले आहेत.
18 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजेपासून, 19 नोव्हेंबर मतदानाच्या पूर्वीचा संपूर्ण दिवस, 20 नोव्हेंबर मतदानाचा संपूर्ण दिवस व 23 नोव्हेंबर मतमोजणीचा संपूर्ण दिवस जिल्ह्यातील सर्व सर्व देशी दारु विक्री, विदेशी मद्या विक्री, परमिट रुम, बिअर बार, बिअर शॉपी, (सीएल-2, सीएल-3, एफएल-2, एफएल-3, फॉर्म इ, एमएलबिआर-2 इ.) विक्री परवाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचा भंग करण्याऱ्यांवर मुंबई दारुबंद कायदा 1949 चे कलम 54 (सी ) नुसार कारवाई करण्यात येणार आहे.
दारु बंद..! पिणाऱ्यांवर मात्र कारवाईच काय?
जिल्ह्यात मद्य विक्री असतांनाच अनेक ठिकाणी जादा भावाने दारु विक्री होते. मात्र, तळीराम दारुची सोय आदल्या दिवशीच लावून ठेवतात तर ‘डेली’वाले (पैसे नसल्याने) जास्त भावाने विक्री होत असलेल्या ठिकाणावरुन दारु विकत घेवून आपली तलफ भागविता. कायद्यानुसार दारु विक्रीवर बंदी, पण दारु पिणाऱ्यांवर बंदी घालता येत नाही व त्यांच्यावर कारवाई सुध्दा होत नाही, हे विशेष!