महावीर जयंती व हनुमान जयंतीला कत्तलखाने आणि मांस विक्री बंद ठेवा !

3

अपर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आदेश

बुलडाणा (शासकीय वार्ता)जिल्ह्यात गुरुवार 10 एप्रिल रोजी महावीर जयंती तसेच शनिवार 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहे. जयंतीनिमित्ताने कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. निर्बंधाच्या कालावधीत मांसविक्री होणार नाही, याची दक्षता देण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.

जैन धर्मियांच्या वतीने महावीर जयंती तसेच हनुमान जयंतीनिमित्त उत्सव मिरवणूक काढण्यात येतात. सध्या विविध राजकीय पक्ष संघटनांकडून सुरु असलेली आंदोलने, औरंगजेबाची कबर काढण्याच्या कारणावरुन नागपूर येथे उद्भवलेली जातीय दंगलीची पार्श्वभूमी, राज्यातील राजकीय घडामोडी व त्यांच्याकडून विविध मागण्या संदर्भात होणारे आंदोलने, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी, तसेच उत्सवाचा मागील इतिहास लक्षात घेता या उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी दक्षता बाळगणे आणि खबरदारीच्या उपाययोजना अंमलात आणून चोख बंदोबस्त नेमणे आवश्यक असल्याने उत्सवाचे काळात 10 एप्रिल रोजी श्री महावीर जयंती उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी, यासाठी कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने बंद ठेवावीत. तसेच कोणत्याही परिस्थितीत मांसविक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.