तळणी: (गणेश वाघ)भक्ती, शक्ती आणि उत्साहाचा त्रिवेणी संगम साधत तळणी येथे ‘मर्यादा पुरुषोत्तम’ प्रभू श्रीराम चंद्र यांचा जन्मोत्सव अत्यंत दिमाखात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले असून, अवघी तळणी नगरी 26 मार्च रोजी श्रीराममय झाली होती.
जन्मोत्सवाच्या पावन पर्वावर सकाळी श्रीराम मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर सायंकाळी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेची सुरुवात प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन आणि आरती करून करण्यात आली. या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीतामाता आणि हनुमानजी यांचा सजीव देखावा. या सजीव देखाव्यातील पात्रांची वेशभूषा आणि सात्विक रूप पाहून भाविक भारावून गेले होते. मार्गावर ठिकठिकाणी या देखाव्याचे दर्शन घेण्यासाठी आणि पूजन करण्यासाठी महिला व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या सोहळ्यात गावातील अबालवृद्ध, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.ग्रामस्थांच्या एकजुटीतून आणि अढळ श्रद्धेतून साकारलेला हा सोहळा तळणी परिसरातील भक्तीच्या वातावरणाला अधिकच उजळून टाकणारा ठरला.
स्वागतासाठी संपूर्ण गाव सज्ज
शोभायात्रा गावातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली होती. या यात्रेच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव सज्ज झाले होते.शोभायात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी आकर्षक आणि रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या होत्या.घराघरांवर भगवे ध्वज फडकवण्यात आले होते, ज्यामुळे संपूर्ण वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती.ढोल-ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता.


























