मोताळा (गणेश वाघ)सर्विंग रेंजर फाउंडेशन या एनजीओ मार्फत मोताळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये शालेय विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. गरिबांच्या जिल्हा परिषद शाळांना ‘अच्छे दिन’ आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या उपक्रमांचे तालुक्यात कौतूक होत आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमधील घटती पटसंख्या लक्षात घेऊन सर्विंग रेंजर्स फाउंडेशन या एनजीओचे स्वयंसेवक दाभाडी येथील वसंत पंढरी तळोले व त्यांचे सहकारी किशोर पाटील, किरण बोरकर, रवींद्र चोपडे, ज्ञानदेव टेकाळे यांच्यासोबत चर्चा करून ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वृद्धिंगत व्हावी याकरिता प्रायोगिक तत्त्वावर एखादा उपक्रम हाती घ्यावा, असे सुचविले. त्या अनुषंगाने सर्विंग रेंजर फाउंडेशन या एनजीओ मध्ये सहभागी होऊन ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मराठी व उर्दू माध्यमातील सर्व शाळेतील विद्यार्थी यांना संस्थेच्या माध्यमातून आवश्यक शैक्षणिक साहित्य गणवेश इत्यादी उपलब्ध करून देण्याचे ठरविले.
संस्थेचे प्रतिनिधी यांनी किरण बोरकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या ग्रामीण शैक्षणिक व्यवस्थेचा कणा असून त्या अधिकाधिक मजबूत व्हाव्या यासाठी सर्विंग रेंजर ही संस्था कायमस्वरूपी काम करणार असून प्रायोगिक तत्त्वावर केवळ शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलेले आहे. यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य व विद्यार्थी तसेच शाळेच्या मागणीनुसार आवश्यक ते सर्व साहित्य उपलब्ध करून देण्याकरिता सर्विंग रेंजर फाउंडेशन नियमित तत्पर राहील, असे सांगितले.
या शाळांमध्ये शैक्षणिक साहित्यांचे वाटप
त्या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषद मराठी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा दाभाडी, अंगणवाडी केंद्र भाग एक व दोन दाभाडी, जिल्हा परिषद प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा शेलगाव बाजार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव जहागीर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणा, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा माकोडी, जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा माकोडी, जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा जहागीरपुर, जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा जहागीरपुर, या जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.



























