प्रकटदिनी श्रीक्षेत्र थळ येथे भक्तीला आले उधाण

442
श्रीक्षेत्र थळ येथे उसळलेला लाखोंचा जनसागर

51 दिंड्यांनी भक्तीमय झाले वातावरण;लाखो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (16 ‍Feb. 2023) श्री संत गजानन महाराज यांच्या 145व्या प्रकटदिनाला मोताळा तालुक्यातील श्रीक्षेत्र थळ येथे श्रीं च्या चरणी विविध जिल्ह्यातील भक्तांनी लाल पताका घेवून 51 दिंड्या थळ येथे दाखल होवून भजनी मंडळी तसेच लाखो भक्तांनी दर्शन घेतले. यावेळी थळनगरीतील संपूर्ण वातावरण गण गणात बोते..च्या गजराने भक्तीमय झाले होते. येणाऱ्या सर्व भक्तांसाठी काँग्रेसचे नेते Adv.गणेशसिंग राजपूत, सुभाषसिंग राजपूत तथा मुकुल वासनीक युवा संग्राम संघटना व पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्यावतीने शिस्तबध्द पध्दतीने दर्शनास येणाऱ्या भाविकांसाठी 55 क्विंटल गव्हाच्या पोळ्या,बेसन, शिरा व भात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

तालुक्यातील श्रीक्षेत्र थळ येथील गजानन महाराज प्रकटदिनासाठी बुलढाणा जिल्ह्यासह, जळगाव खांदेश, औरंगाबाद व जालना येथील ग्रामीण भागातील भाविक तसेच 51 दिंड्या सहभागी झाल्या होत्या. भाविकांनी खांद्यावर भगव्या पताका घेवून टाळ, मृदंगाच्या गजर व मुखी जय गजानन या गजराने संपूर्ण परिसर दुमदूमुन गेला होता. दिंड्यांचे संस्थानच्यावतीने दिंड्यांचे शेलाटोपी व नारळ देवून स्वागत करण्यात आले. आ.संजय गायकवाड व ॲड.गणेशसिंग राजपूत यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. येथे व्यावसायीकांनी आपले प्रसाद व खेळण्यांची आपले दुकाने थाटली होती. महाआरतीनंतर शिस्तबध्द पध्दतीने भाविकांना ताटामध्ये बेसनपोळी, शिरा व भाताचे वाटप करण्यात आले यासाठी भव्य असा मंडप उभारण्यात आला होता. येथे जवळपास 90 हजार ते 1 लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या महाप्रसादवेळी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, उध्दव ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, काँग्रेसची मोताळा तालुकाध्यक्ष निताताई पाटील, तालुकाध्यक्ष गजानन मामलकर, सुनिल तायडे, उखा चव्हाण, अनिल पाटील, उत्तमराव वैराळकर, भोजराज पाटील यांच्यासह आदींची हजेरी लावली होती.

  • मंदीरासाठी 30 लाखाचा निधी देणार- आ.गायकवाड
    आ.संजय गायकवाड आमदार झाल्यापासून त्यांनी बुलढाणा मतदार संघामध्ये शासनस्तरावरुन करोडो रुपयांचा निधी खेचून आणीत विविध विकास कामे मार्गी लावले आहेत. श्रीक्षेत्र थळ येथे आ.संजय गायकवाड यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी आ.गायकवाड यांनी मंदीराच्या विकासासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करुन मंदीरासाठी 30 लाखाचा निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन भाविकांना दिले.
  • राजपूत कुटुंबीयांची महाप्रसादाची परंपरा कायम..
    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुक्तत्यारसिंग राजपूत हे मागील 14 वर्षापासून येथे भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करतात. यावर्षी सुध्दा त्यांचे सुपूत्र Adv.गणेशसिंग राजपूत यांच्यावतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी 55 क्विटलची पोळी, बेसन, शिरा व भाताची व्यवस्था करुन श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या 1 लाख भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.