अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील पीके झाले उध्दवस्त ; कृषी विभागाचा अंदाज
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (19 Mar.2023)
बुलढाणा- निसर्गामध्ये दिवसेंदिवस मोठा बदल होत चालला आहे, हिवाळा व उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडत असल्याने मोठा प्रमाणात कर्जबाजारी होत आहे. जिल्ह्यात 17 व 18 मार्च रोजी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने गहू, हरबरा, मका, कांदा आदी तोंडाशी आलेले पिके उध्दवस्त झाल्याने जिल्ह्यातील जवळपास 96 गावांना फटका बसला बसून 2 हजार 371 हेक्टरवरील पीके उध्दवस्त झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
जिल्ह्यात शनिवार 18 मार्च रोजी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावीत मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने फळ पिकांच देखील मोठे नुकसान झाले आहे. संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे रात्री वीज पडून एका गाईचा मृत्यू झाला. मार्च महिन्यात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात उन असते, परंतु निसर्ग चक्र बदलल्याने सर्वीकडे हिवाळ्यासारखी ठंडी आहे. जिल्ह्यात 17 व 18 मार्च रोजी मोताळा तालुक्यातील डिडोळा, चिंचपूर, सांगळद, महालपिंप्री, तिघ्रा येथे गारपीट झाल्याने गहू व हरबऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच जळगाव जामोद, संग्रामपूर ,मेहकर ,खामगाव व मलकापूर या पाच तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी बरसला. गारपिट झाल्याने फळ पिकांचे नुकसान झाले असून वादळी पावसाने 96 गावे बाधित झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. जळगाव जामोद तालुक्यातील 11, संग्रामपुर 21, मेहकर 3, खामगाव 25 तसेच मलकापूर तालुक्यात सर्वाधिक 31 गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर इतर तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. घाटाखाली मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. सध्या गहू हरभरा काढणे सुरू असून अवकाळीमुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली असून काही भागात शेतकऱ्यांनी ओलाच गहू काढल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात टुश्या झाल्या आहेत. तसेच हरबरा, गहू , कांदा, डाळिंब, संत्रा, आंबा, ज्वारी, भाजीपाला हे पिके देखील उद्ध्वस्त झाले आहेत. सदर नुकसानीचा सर्वे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. संग्रामपूर तालुक्यात शनिवार 18 मार्च रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने येथील वरवंट बकाल येथील शेतकरी प्रशांत रौंदळे यांच्या गट नंबर 54 मध्ये शेतातील गोठ्यावर वीज पडून गायीचा मृत्यू झाल्याने त्यांचे 50 हजाराचे नुकसान झाले आहे.
सर्वे करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी -तुपकर
अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आधीच संकटात सापडलेला शेतकरी आणखी मोठ्या आर्थिक अडचणीत साडपला आहे. पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाचा सर्वे प्राथमिक असून प्रत्यक्षात कितीतरी पटीने मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचा तात्काळ सर्वे करून शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.