कुठं चालला बळीराजाचा महाराष्ट्र; शेतकऱ्यांचा वाली कोण?
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (24.May.2023) आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकांची एकी आहे, मग तो राजकीय नेता, मंत्री, आमदार, खासदार की छोटा-मोठा शासकीय अधिकारी या सर्वाच्या एकीमुळे त्यांना कोणताही संघर्ष न करता सर्व काही त्यांच्या पदरात पडते. परंतु शेतकऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागतो, आणि पदरात काहीच पडत नसल्यामुळे तो मोठ्या आर्थिक अडचणीत सापडत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरात भाव वाढेल या आशेने शेकडो क्विंटल कापूस पडून आहे. मात्र कापसाला 6500 रु.क्विंटल भाव मिळत असल्याने मोताळा तालुक्यातील कोथळी येथील शेतकरी संतोष काशीराम जोहरी यांनी कापूस गुरा-ढोंराना चारुन सरकारचा शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदवून सरकारकडे खतांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे, मग सरकार 1500 रु.खताची बॅग 700 रुपयात शेतकऱ्यांना का देत नाही, असा थेट प्रश्नच उपस्थित केला आहे.
मोताळा तालुक्यातील कोथळी येथील शेतकरी संतोष जोहरी यांचे नागझरी शिवारात गट नं.27 मध्ये 10 एकर शेती आहे. त्यांना यावर्षी 120 क्विंटल कापूस झाला. कापूस घरात आणेपर्यंत त्यांना प्रतिकिलो 40 रुपये खर्च लागला. आणि कापसाचे मे महिन्यातले 6500 रुपये प्रतिक्वींटल भाव तर फर्दडीच्या कापसाला 40 रुपये किलो भाव मिळत असल्याने शेतकरी संतोष जोहरी यांनी सदर कापूस घरी नेला तर घरात जागा नाही, इतरत्र ठेवला तर अंगाला खाज येते. कापसाला चांगले भाव न मिळाल्याने 120 क्विंटल कापूस घरात आहे. गुरांना ढेप कुठून आणावी व व्यापाऱ्यांनी फर्दडीचा 40 रुपये किलो मागलेला कापूस त्यांना न देता 12 ते 13 गुरांना दररोज 30 ते 40 किलो फर्दडीचा कापूस खावू घालून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदवित असल्याचा, त्यांचा व्हीडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
मे महिन्यात वाढणारे भाव घसरले..
शेतकरी म्हटला की, तो निसर्गाच्या भरवश्यावर अवलंबून असतो, कधी ओला, कधी कोरडा तर कधी अवकाळी यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात मेटाकुटीस आला आहे. त्यातच सरकारने शेतकऱ्यांची एकी तोडण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालाला भाव न देणे, यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. सध्या कापसाचे भाव 6500 रुपये क्विंटल आहे, दरवर्षी मे महिन्यात 2 हजार रुपयांची वाढ होते. परंतु यावर्षी एप्रिल महिन्यात 8000 हजार भाव असलेल्या कापसाचे मात्र 1500 रुपयांनी भाव घसरले आहे.
सत्ताधारी व विरोधकांची चुप्पी!
यावर्षी शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने उत्पन्न मोठे झाले. मागीलवर्षी खर्च कमी असल्याने 10 एकरामध्ये 60 क्विंटल कापूस झाला होता, तो 12700 रु.क्विंटल भावाने विकला होता. यावर्षी शेतीचा माल घरीआणेपर्यंत एकरी 40 ते 50 हजार रुपये खर्च लागला, त्यामाने 120 क्विंटल कापूस झाला परंतु 6500 रुपये क्विंटल भाव असल्यामुळे शेतीला लावलेला पैसा काढून कर्ज कसे फेडावे, कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, शेती कशी पेरावी, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. याबाबत सत्ताधारी, विरोधक, लोकप्रतिनिधी आमदार, खासदार व शेतकरीनेते कुणी बोलायला तयार नसल्याची खंत त्यांनी’बुलडाणा न्यूज अपडेट’शी बोलतांना व्यक्त केली आहे.




























