जि.प.सीईओ अॅक्शन मोडवर: ‘लंबे ब्रेक के बाद’ गूड मार्निंग पथकाची स्थापना
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (10.JUNE.2023) ओ…,भो आता जिल्हा कागदोपत्री शंभर टक्के हागणदारीमुक्त झाला आहे. घरात संडास असून सुध्दा सकाळी-सकाळी हातात गुटख्याची पुडी, मोठा स्मार्ट फोन घेवून रोडवर हागणाऱ्यांची संख्या काही कमी होत नसल्यामुळे जिल्हा परिषद सीईओ अॅक्शन मोडवर आल्या असून आता उघड्यावर हागणाऱ्यांवर मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ११५ ते ११७ नुसार कारवाई होणार आहे. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ‘लंबे ब्रेक के बाद’ 77 ‘गूड मार्निंग’ पथकाची स्थापना केली आहे.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत ग्रामीण भागामध्ये अभियानाचे पहिल्या टप्प्यात गावातील प्रत्येक घरोघरी शौचालया बांधकामासाठी लाभाथ्र्यांना प्रवृत्त करून घरोघरी संडासची सुविधा निर्माण करण्यात आली. असे असतांना सुध्दा अनेक गावांमध्ये संडासची सुविधा असतांना काही ‘एसी’ सवय लागलेले लोटा बहाद्दर उघड्यावर थंड वातावरणात हागायला जात असल्याचे चित्र निदर्शनास आल्याने जिल्हा परिषद सीईओ.भाग्यश्री विसपुते यांनी गटविकास अधिकारी यांना ‘गूड मार्निंग’ पथकांची स्थापना करुन उघड्यावर हागणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याने आता उघड्यावर हागणाऱ्यांवर मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ११५ ते ११७ नुसार कारवाई होणार आहे. शुक्रवार ९ रोजी नांदुरा पंचायत समिती अंतर्गत या ‘गूड मॉर्निंग’पथकांद्वारे काही गावात या पथकांनी आकस्मिक भेटी दिल्याने लोटेबहाद्दरांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली आहे.
सार्वजनिक आरोग्यास धोका पोहचविणे एक अपराध
मुंबई पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कलम ११५ व ११७ अन्वये उघड्यावर शौच विधी करून सार्वजनिक आरोग्यास धोका पोहोचविणे हा एक दंडनीय अपराध आहे. असे असताना सुद्धा बहुतांश लोटेबहाद्दर हे आपल्या गावाच्या सार्वजनिक आरोग्यास बाधा पोचवत आहे. अश्या लोटेबहाद्दरांवर कारवाई करण्यात येणार असल्याने वो…भो आता उघड्यावर हागायला बसू नका, गावाची स्वच्छता राखावी , असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात 77 ‘गूड मार्निंग’ पथके कार्यान्वीत
उघड्यावर हागायला बसणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये 77 ‘गूड मार्निंग’ पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये बुलढाणा तालुक्यात ५, चिखली तालुका ७, दे. राजा ६, सिंदखेड राजा ५, लोणार ५, मेहकर तालुका ६, खामगाव तालुका १४, शेगाव ५, संग्रामपूर ५, जळगाव जामोद ५, नांदुरा ५, मलकापूर ५, मोताळा 4 असे संपूर्ण जिल्ह्यात एकूण ७७ पथकांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक पथकात ५ ते ७ सदस्यांचा समावेश आहे.
पं.स.मध्येच शौचालयाचा वापर होत नाही
जिल्ह्यातील काही पंचायत समितीमध्ये प्रसाधनगृह व शौचालय आहे. परंतु त्या शौचालयाला दरवाजे नाहीत. त्या शौचालयातील घाण पाहून त्यामध्ये कोण हागायला बसेल हा एक मोठा प्रश्न आहे. काही अधिकारी व कर्मचारी बाहेर उघड्यावरच मुतायला व हागायला जाणे पसंद करीत आहे. प्रथम पंचायत समितीमध्ये अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी वेगळा शौचालय व कामानिमित्त येणाऱ्यांसाठी शौचालय व प्रसाधनगृह निर्माण करुन त्याची साफसफाई करणे गरजेचे असल्याची सुज्ञ नागरिकांकडून मागणी होत आहे.