जिल्ह्यातील दहा तालुक्यात लम्पींची लागण जिल्ह्यात लसीकरण सुरू; सतर्कता बाळगण्याचे आवाहन

152

बुलडाणा (BNU न्यूज)- आजाराचा जिल्ह्यातील दहा तालुक्यात लागण झाली आहे. यामुळे जिल्ह्यात पशूंच्या लसीकरणास सुरवात झाली आहे. नागरिकांनी या आजाराबाबत सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात लम्पी चर्मरोग प्रथमत: आढळून आला आहे. सध्यापर्यंत 10 तालुक्यात या रोगाची लागण झाली आहे. दहा तालुक्यातील 271 पशू बाधित झाले असून 175 पशू रोगातून बरे झाले आहे. यातील 3 पशूंचा मूत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 21 हजार 771 पशूंचे लसीकरण करण्यात आले आहे. आजपर्यंत 97 हजार 600 लसी उपलब्ध झाल्या आहेत. लसीकरणाचे काम पशु रूग्णालयात दररोज सुरू आहे.

पशूपालकांमध्ये या रोगाविषयी या आजाराविषयी गैरसमज निर्माण झाले आहे. हा रोग पशूंपासून माणसांना होत नाही. हा रोग जनावरांवरील नियमित उपचाराणे बरा होणारा आहे. पशुपालकांनी जनावरांमध्ये रोगाची लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकीय रूग्णालय किंवा पंचायत समिती किंवा जिल्हास्तरीय कक्षाशी संपर्क करावा. लम्पी हा आजार विषाणूजन्य आहे. हा विषाणू अत्यंत संसर्गजन्य आजार, देवी विषाणू गटातील कप्रिपाक्स प्रवर्गातील आहे. रोग प्रसार हा चावणाऱ्या माश्या, डास, गोचीड, चिलटे, बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्श, दूषित चारा आणि पाणी यामुळे होतो. अंगावर 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी, सुरुवातीस भरपूर ताप, डोळे, नाकातून चिकट स्त्राव, चारा पाणी खाणे बंद किंवा कमी, दूध उत्पादन कमी होणे, काही जनावरांच्या पायावर सूज येऊन लंगडणे, ही लक्षणे आहेत. गोठ्यामध्ये डास, माश्या, गोचीड होणार नाही याच दक्षता घ्यावी. जनावरांवर उपचार करताना नवीन सिरींज निडलचा वापर करावा. गोठ्यामध्ये बाहेरील व्यक्ती, डॉक्टर येत असल्यास सर्वप्रथम त्यांचे निर्जंतुकीकरण करावे. साथीचा आजार सुरु असेपर्यंत बाजारातून जनावरांची खरेदी विक्री थांबवावी, ही या रोगावरी नियंत्रण करण्याच्या उपाययोजना आहेत. रोगावर नियंत्रणासाठी बाधित जनावरांना तात्काळ वेगळे करावे. गोठ्यामध्ये सोडियम हायपोक्लोराईड, फिनाईल फवारणी करावी. जनावारांना आयव्हरमेक्टिन इंजेक्शन दिल्यास कीटक, गोचिडाचे नियंत्रण होते. गावामध्ये कीटकनाशकाची फवारणी करण्याची काळजी पशुपालकांनी घ्यावी.

  • नियंत्रण कक्ष जाहीर..
    लम्पी आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष संपर्क जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. ए. बी. लोणे 8329122297, डॉ. आर. एस. पाटील 9689330341, डॉ. टी. एस. पाटील 8999918104, डॉ. व्ही. ए. ऊइके 7841853224, डॉ. डी. व्ही. जुंदळे 9403740047 यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग, पशु वैद्यकीय रूग्णालय, जिल्हा आणि तालुकास्तरीय कक्ष आणि संबंधित पशुवैद्यकीय रूग्णालयांचे मोबाईल क्रमांक जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.