दोन लाखाचे नुकसान; सर्वे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी
मोताळा- (गणेश वाघ)तालुक्यातील तळणी येथे गुरुवारी अचानक वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये वीज पडल्याने श्रीनिवास नाफडे यांचा तीन एकरातील हरबरा जळून खाक झाल्याने त्यांचे 2 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविल्या जात आहे. पंचनामा झाल्यानंतर खरा आकडा समोर येईल.
गुरुवार १९ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसादरम्यान शेतात वीज पडल्याने, सोंगणी करून ठेवलेला सुमारे अडीच ते तीन एकर क्षेत्रातील हरभरा जळून खाक झाला आहे. या आगीत शेतकरी श्रीनिवास पद्माकर नाफडे यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांचा वादळी पावसाने कापणी वर आलेला गहू आणि मका पिक जमीनदोस्त झाल्याने मोठे नुकसान झाले . पाच दिवसांपूर्वीच नाफडे यांनी मजुरी लावून हरबऱ्याची सोंगणी (कापणी) पूर्ण केली होती आणि मळणी यंत्राद्वारे काढणी करण्यासाठी शेतातच हरभऱ्याची मोठी गंजी (रांग) लावून ठेवली होती. दरम्यान गुरुवारी १९ मार्चच्या रात्री अचानक वातावरणात बदल झाला. विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. याच दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास नाफडे यांच्या शेतातील हरभऱ्याच्या गंजीवर अचानक वीज कोसळली. हरभरा सुका असल्याने आगीने तत्काळ पेट घेतला आणि पाहता पाहता संपूर्ण ढिगारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. रात्रीची वेळ असल्याने आणि पावसाचा जोर असल्याने आग विझवणे शक्य झाले नाही. यामध्ये त्यांचे दोन लाखाचे नुकसान झाल्याची चर्चा आहे. या भीषण आगीत केवळ धान्यच जळाले नाही, तर जनावरांसाठी वर्षभर लागणारा चारा (कुटार) देखील जळून खाक झाला आहे. महसूल विभागाने आणि कृषी विभागाने या घटनेचा तसेच इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ स्थळ पंचनामा करून आणि नैसर्गिक आपत्ती अंतर्गत श्रीनिवास नाफडे यांना योग्य ती आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.




























